चेहर्‍याला जिवंत करणारे रंगभूषाकार नाना

चेहर्‍याला जिवंत करणारे रंगभूषाकार नाना
Published on
Updated on

नाशिक (प्रासंगिक) : दीपिका वाघ

नाशिकमधील नाट्यक्षेत्रातील रंगभूषाकार माणिक कानडे उर्फ नाना सर्वत्र परिचयाचे. नाटक तर आहे पण रंगभूषा कोण करणार? आपले नाना आहेत ना… असे उत्स्फूर्त शब्द सहजच नाट्यकर्मींच्या तोंडून बाहेर येतात. इतके ते सर्वांच्या परिचयाचे आहेत. नाशिकमध्ये सुरू असणार्‍या 61 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ते रंगभूषाकार म्हणून काम करत आहेत. ते 80 च्या दशकापासून रंगभूषाकार म्हणूत काम करत आहेत त्यांच्याविषयी…

नाटकातील पात्रांना भूमिकेनुसार रंगभूषा करणे तसे चॅलेंजिंग काम असते. भूमिका जितकी महत्त्वाची, तेवढीच ती जिवंत वाटावी म्हणून अभिनयासोबतच रंगभूषाही महत्त्वाची असते. नाटकात एकाच पात्राच्या भूमिका सतत बदलत असतील, तर सर्व वेळेचा खेळ असतो. आणि हेच चॅलेंजिंग काम 80 च्या दशकापासून नाटक या क्षेत्रात रंगभूषाकार म्हणून माणिक कानडे करत आहेत. मूळचे सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले माणिक कानडे तथा नाना यांना नाटक कशाशी खातात, हेदेखील माहिती नव्हते. एका हिंदी नाटकाच्या कलाकाराला धोतर नेसवून दिले आणि हे काम काहीतरी वेगळे असल्याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी हिंदी-मराठी नाटकांत कामे करायला सुरुवात केली. मुन्शी प्रेमचंद यांच्या 'कफन' नाटकात पहिली भूमिका केली. त्यानंतरही त्यांनी अनेक नाटकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. त्यानंतर त्यांनी ऑन स्टेजपेक्षा बॅकस्टेज म्हणजे रंगभूषा करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. कलाकाराला भूमिकेसाठी एक वयाची अडचण असते पण तंत्रज्ञ म्हणून बॅकस्टेजचे काम करायला वयाची कोणतीही अट नसते, हेही त्यामागे एक कारण होते. रेणुकानगर भागात 'दैवत' या मराठी सिनेमाचे शूटिंग सुरू होते. त्यामध्ये रंजना, अशोक सराफ, नाशिकचे मात्री मंत्री छगन भुजबळ भूमिका करत होते. त्यावेळी नाना हे तिथेच होते. रंजना या त्यांच्यासमोरून गेल्या आणि काही वेळानंतर म्हातारीच्या गेटअपमधून त्यांच्या समोरून गेल्या. त्यांना काही कळलेच नाही, हे असे कसे घडले? एक कुतूहल निर्माण झाले आणि तिथूनच या कामाचे बीज रोवले गेले. रंगभूषेत एवढी ताकद असते की, ते तरुणाला वृद्ध, ऐतिहासिक, धार्मिक कोणत्याची साच्यात उतरवू शकते. कलाकाराला फक्त त्याची भूमिका रंगमंचावर जिवंत करावी लागते. त्याकाळचे नाशिकचे रंगभूषाकार नेताजी भोईर, नारायण देशपांडे, सतीश सामंत यांचे काम ते बघायचे. काम बघत बघत शिकायचे, त्यांच्या कामात साइड मेकअप करायचे. या कामाचे त्यांनी कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही. केवळ आवडीचा भाग म्हणून हे काम करायला सुरुवात केली. आजवर अनेक राज्यनाट्य स्पर्धा, बालनाट्य, कामगार कल्याण, हिंदी, संस्कृत स्पर्धेतल्या नाटकांसाठी त्यांनी काम केले आहे.

नाना सांगतात की, नाटकातील पात्रांना रंगभूषा करताना मी आधीच मुलांना सांगतो की, मी तुमचा बाबा आहे असं समजा त्यामुळे होतं काय की, कलाकारांना भूमिकेचं कोणतंही दडपण येत नाही आणि त्यांची भूमिका रंगमंचावर छान खुलत जाते. आता हजार व्हॅटचे लाइट्स असल्याने लाइट मेकअप करणे चॅलेंजिंग असते. ऐतिहासिक, धार्मिक भूमिका असेल, तर रंगभूषा करायला जास्त मजा येते. शिवाजी महाराज, संभाजी राजे यांच्या पेहरावात बरेचसे साम्य आहे. त्यांची रंगभूषा करताना, दाढी ठेवताना महाराजांच्या दाढीला पोक्तेपणा ठेवावा लागतो, तर राजेंच्या दाढीला कोवळेपणा ठेवावा लागतो, असे बारकावे प्रत्येक भूमिका आणि कलाकारानुसार बदलत असतात त्याचा अभ्यास करून रंगभूषा केली जाते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news