

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी रेल्वेतून एकत्र प्रवास केल्याचे समोर आले आहे. या दोन नेत्यांच्या एकत्र प्रवासाने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १६ जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील अमळनेरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय विभागाचा एक दिवसीय शिबिरास ते मार्गदर्शन देखील करणार आहेत.
दरम्यान, मुंबईतून शरद पवार आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सोबत प्रवास करत आहेत. या कार्यक्रमासाठी आज (१५ जून) शरद पवार हे मुंबई येथून रेल्वेत गाडीत बसले. या दरम्यान शरद पवार ज्या डब्यात होते, त्या डब्यात शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा दिसून आले. गुलाबराव पाटील व शरद पवार एकाच डब्यातून प्रवास करताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार व मंत्री गुलाबराव पाटील या दोघांमध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा झाली आहे.