Kirit Somayya : ठाकरेंचे भागीदार वायकर यांच्या पंचतारांकित हॉटेलवर कारवाई होणार; किरीट सोमय्यांचा दावा | पुढारी

Kirit Somayya : ठाकरेंचे भागीदार वायकर यांच्या पंचतारांकित हॉटेलवर कारवाई होणार; किरीट सोमय्यांचा दावा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरूवारी (दि. १५) पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. रविंद्र वायकर यांच्या जोगेश्वरीतील पंचतारांकित हॉटेलचा घोटाळा सिद्ध झाला असून ते उद्धव ठाकरे यांचे भागीदार आहेत. या घोटाळ्याप्रकरणी वायकरांवर लवकरच कारवाई होईल, असा दावा सोमय्यांनी केला.

राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेला वायकर यांच्या घोटाळ्यावर ताबडतोब कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वायकरांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे करणार असल्याची माहिती सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून दिली. २०२१ मध्ये या पंचतारांकित हॉटेलसाठी उद्धव यांनी २ लाख चौरस फुटांची जागा दिली होती. लहान मुलांचे खेळायचे मैदान असलेली ही जागा २००९ मध्ये मुंबई महानगर पालिका अखत्यारित होती. येत्या २४ तासांमध्ये वायकरांच्या हॉटेलचा परवाना रद्द होईल तसेच त्यावर हातोडा पडेल,असा दावाही सोमय्यांनी केला.

दरम्यान संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मयूर शिंदेला अटक केल्याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे. शिंदे आणि राऊत कुटुंबियांचे घनिष्ठ संबंध होते.त्यांचे व्यावसायिक संबंध देखील आहेत. पंरतु, काही कारणास्तव संबंधांमध्ये दुरावा आल्यानंतर धमकी देणाऱ्या शिंदेवर केलेली कारवाई योग्यच असल्याचे ते म्हणाले. या दोघांमध्ये दुरावा आला आहे, की ही फिक्सिंग होती याचाही शोध मुंबई पोलिसांनी घेतला पाहिजे. शिंदे वसुली करण्यात पटाईत आहेत, हे सर्वांना माहिती आहे.त्याने मलाही धमकी दिली होती,असा दावा सोमय्यांनी केला.

संबंधित बातम्या

दरम्यान जाहिरातीवरून राज्यात निर्माण झालेल्या राजकीय वादंगावर थेट उत्तर देणे सोमय्यांनी टाळले.काही बाबतीत मदभेद असतीत तर ते घरात बसून सोडवू ,अशी सारवासारव त्यांनी केली.मुलूंड येथील लव जिहाद प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सोमय्यांनी स्वागत केले आहे. ३६ तासांमध्ये पोलिसांनी पीडित मुलीच मोहम्मद फैजान या मुलाच्या तावडीतून सुटका करीत पालकांच्या स्वाधीन केले असल्याचे ते म्हणाले. लव जिहादचे प्रकरण वाढत असल्याने सरकारने तातडीने कायदा करावा,अथवा अतित्वात असलेल्या कायद्यात कठोर तरतूदी करण्याची मागणी सोमय्यांनी केली.

Back to top button