संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती : नितिन गडकरी

नितिन गडकरी
नितिन गडकरी
Published on
Updated on

नाशिक ; पुढारी वृत्तसेवा एक काळ असा होता की, आपण शस्त्र आयात करत होतो. मात्र आता स्वदेशी बनावटीची शस्त्र विकसीत करून आपण ती शस्त्रे निर्यात करू. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

इदगाह मैदानावर भारतीय सैन्य दलातील तोफखाना केंद्र व खा. हेमंत गोडसे यांच्या संकल्पनेतून 'नो युअर आर्मी' या कार्यक्रमांतर्गत तोफखाना केंद्रातील तोफांचे व शस्त्रसाठ्याचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्याप्रंसगी गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले, मेक इन इंडिया अंतर्गत भारतातच शस्त्र निर्मिती होत असल्याने आपण स्वावलंबी होत असून, यापुढे दुसऱ्या देशाची भारतावर वाकडी नजर टाकण्याची हिंमत होणार नाही.

भारतातील अनेक उद्योग समुहांनी स्वारस्य दाखवल्याने सैन्य दलासाठी शस्त्र, वाहने उभारण्यात येत आहेत. तंत्रज्ञान आणि ज्ञानाला महत्व असून, त्यांची शक्ती हे भविष्य आहे. देशांतर्गत शस्त्र उभारणी केली जात असल्याने सरंक्षण क्षेत्रात रोजगार निर्मितीही वाढत आहे. नागपूर येथे राफेल एअरक्राफ्ट उभारले जात असून, तेथील ४५० विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. नागपूर हे एविएशन हब बनवण्याचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे नाशिकलाही एचएएलमध्ये विमान बनवले जात असून भविष्यात सरंक्षण क्षेत्रात रोजगार वाढेल. नागरिकांना भारतीय सैन्य दलाच्या उपकरणे, शस्त्रसाठ्याची माहिती व्हावी, सैन्य दलात सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.

प्रास्ताविकात स्कुल ऑफ आर्टीलरीचे कमांडन्ट लेफ्टनंट जनरल एस हरिमोहन अय्यर यांनी सांगितले की, भारतीय सैन्य दल आत्मनिर्भरतेकडे जात आहे. ५ हजार ६०० अग्निवीर प्रशिक्षण घेत आहे. सैन्य दलासाठी नवीन उपकरणे, शस्त्रसाठा तयार केला जात आहे. देशाच्या विकासासाठी सैन्य दल बांधील आहे. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, तोफखान्याचे कमान्डंट ब्रिगेडियर ए.रागेश, खा. गोडसे, पालकमंत्री दादा भुसे, ना. गिरीष महाजन, आ. सीमा हिरे, देवयानी फरांदे यांच्यासह सैन्य दलातील अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात प्रथमच सैनिकी शस्त्रांस्त्रांचे प्रदर्शन सार्वजनिक मैदानावर होत आहे. यानिमित्ताने नाशिकसह संपुर्ण उत्तर महाराष्ट्रातील जनतेला तोफखान्याच्या शक्तीशाली आधुनिक तोफांसह रडार सिस्टीम, अत्याधुनिक रायफल्स, अश्वारूढ सैनिकांकडून दाखविले जाणारे सैनिकी प्रात्याक्षिकांसह तोफखाना केंद्राच्या विशेष बॅन्ड पथकाच्या गीतगायन-वादनाचा अनुभव घेता येणार आहे. रविवारी (दि.१९) रात्री साडेनऊ वाजता प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.

प्रदर्शनात या तोफा आहेत 

कारगिल विजयात सिंहाचा वाटा ठरलेली बोफोर्स, स्वदेशी बनावटीची आधुनिक धनूष, होवित्झर (एम-७७७), इंडियन फिल्ड सॉल्टम (१५५ एम.एम), हलकी तोफ (१०५ एमएम), उखळी मारा करणारी तोफ (१३० एम.एम), मोर्टार (१२० एम.एम), मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर (बीएम २१), लोरोस रडार सिस्टीमसह १९ लहान-मोठ्या पल्ल्याच्या तोफा नागरिकांसाठी प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच भुदलातील सैन्याकडे असलेल्या आधुनिक रायफल्स, मशिनगन्सदेखील आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news