नाशिक : महाराष्ट्र केसरी उपविजेता प्रकाश बनकरने जिंकली २ लाखांची इनामी कुस्ती

नाशिक : महाराष्ट्र केसरी उपविजेता प्रकाश बनकरने जिंकली २ लाखांची इनामी कुस्ती
Published on
Updated on

पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथील मखमलाबादच्या प्रसिद्ध २ लाखाच्या इनामी कुस्तीचा मान कोल्हापूरच्या प्रकाश (विशाल) बनकर याने पटकावला. त्याने अक्षय शिंदे याला चितपट करत मखमलाबादच्या मातीतील मैदान मारले. मखमलाबादचे तालिम फौंडेशन आणि नाशिकच्या जय बजरंग तालीम संघाकडून या नामी कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही पैलवान महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील उपविजेते असल्याने या कुस्तीच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून होते.

आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्या प्रेरणेने आणि नाशिक शहर तालिमसंघाचे उपाध्यक्ष पैलवान वाळू काकड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २२ वर्षांपासून मखमलाबादमध्ये या भव्य निकाली कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन केले जाते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, शासनाने नियमही शिथिल केले आहेत. तसेच अनेक कुस्तीप्रेमींच्या आग्रहानंतर मखमलाबाद येथील मराठा मंगल कार्यालयासमोरील मैदानात गुरुवारी सायंकाळी या निकाली कुस्त्यांची भव्य दंगल पार पडली. या कुस्तीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकमधूनही शेकडो पैलवानांनी हजेरी लावली होती.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ॲड. राहुल ढिकले, माजी खा. देवीदास पिंगळे, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, उद्योजक बुधाशेठ पानसरे, बाळासाहेब पालवे, बाळासाहेब पिंगळे यांच्यासह गोकुळ घोलप, विष्णुपंत म्हैसधुणे, विलास कड रंगनाथ थेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे, पुंडलिक खोडे, सुभाष काकड, नामदेव पिंगळे, दामोदर मानकर, साहेबराव काकड, रामभाऊ काकड, माणिक गायकवाड, चंद्रकांत काकड, सचिन पिंगळे, योगेश पिंगळे, संजय पिंगळे, पैलवान भरत काकड, राहूल काकड, सागर गायकवाड आदी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन कुस्तीचा आनंद लुटला आणि नावाजलेल्या पैलवानांना प्रोत्साहन दिले. कुस्ती विजेत्यांसाठी अगदी पाच हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंतचे इनाम ठेवण्यात आले होते. यावेळी पार पडलेली मानाची कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दोन लाख इनाम असलेली ही कुस्ती प्रकाश बनकर आणि अक्षय शिंदे या दोन महाराष्ट्र केसरी उपविजेत्यांमध्ये रंगली.

अटीतटीच्या लढतीत प्रकाश बनकरने अक्षय शिंदेला चितपट करीत बाजी मारली. यासाठी दिवंगत आमदार उत्तमराव ढिकले यांच्या स्मरणार्थ आमदार राहुल ढिकले यांच्यातर्फे एक लाख तर व दिवंगत बंडू पाटील-पिंगळे यांच्या स्मरणार्थ परफेक्ट डाळिंब मार्केटचे बापूशेठ पिंगळे यांच्यातर्फे एक लाख रुपये असे दोन लाखांचे बक्षीस असलेली इनामी कुस्ती प्रकाश बनकर याने जिंकली. पंच म्हणून पैलवान वाळू काकड यांनी काम पाहिले. अन्य कुस्त्यांमध्ये बाळू बोडके, संदीप निकम, उदय काकड, मंथन काकड, माऊली गायकवाड, सागर चौगुले, ओमकार फरतडे आदी पैलवानांनी चांगल्या कुस्त्या करत बाजी मारली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news