लासलगाव, पुढारी ऑनलाईन : प्रेम प्रकरणातून भावनिक होत अल्पवयीन मुलाने लासलगाव पोलीस कार्यालयाच्या आवारात विषारी औषध सेवन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आवारात उपस्थित असलेल्या पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे या मुलाचे उपचारानंतर प्राण वाचले आहेत. आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्यावर पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
येवला तालुक्यातील भिंगारे येथील अल्पवयीन मुलाचे एका युवतीवर प्रेम होते. मात्र, युवतीच्या घरच्यांचा युवक अल्पवयीन असल्याने प्रेम प्रकरणाला विरोध होता. युवती लासलगाव पोलीस कार्यालयाच्या हद्दीत राहत आहे. यापूर्वी पोलीस कार्यालयात यासंदर्भात युवती हरविल्याची तक्रार देण्यात आली होती.
याच कारणास्तव शनिवार (दि.५) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास या युवकाने पोलीस कार्यालयाच्या आवारात प्रवेश करत जवळच असलेल्या दत्त मंदिराशेजारी जाऊन विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आवारात उभे असलेले पोलीस नाईक संदीप शिंदे आणि होमगार्ड यांच्या लक्षात ही घटना येताच या युवकाला तातडीने औषधोपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथे नेण्यात आले.
तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या युवकावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वृत्त आहे. सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ कोठुळे व पोलीस तपास करत आहेत.