

जळगाव :
राज्यात तसेच जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. काही ठिकाणी तर प्रतिष्ठेची लढाईही झालेली आहे. अशातच यावलमधील ईव्हीएम मशीन ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले आहे, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व भाजपाच्या उमेदवारांनी दोन खासगी सुरक्षा रक्षक नेमले आहेत. यासाठी तहसीलदारांची परवानगी सुद्धा घेण्यात आलेली आहे.
यावरून उमेदवारांना कोणावर विश्वास दाखवायचा आहे हेच समजत नाही. राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार असतानाही भाजपाचे उमेदवार खासगी सुरक्षा रक्षक ठेवत असतील तर ईव्हीएम मशीनमध्ये कुठेतरी घोटाळा होऊ शकतो, अशी चर्चा रंगू लागलेली आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये नगरपरिषद व नगरपंचायतींच्या 18 ठिकाणी निवडणुका झाल्या. यामध्ये भुसावळ, मुक्ताईनगर, चाळीसगाव, पाचोरा या ठिकाणच्या निवडणुका सर्वाधिक हॉट व संवेदनशील होत्या. भुसावळमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठा सुरक्षा बंदोबस्त ठेवला होता. तर मुक्ताईनगरमध्ये झालेल्या शाब्दिक वाद, गुन्हे दाखल यामुळे तेथील निवडणूक चर्चेत राहिली.
तर यापलीकडे नगराध्यक्षाच्या चुरशीच्या लढाईमध्ये यावलही मागे राहिलेले नाही. यावलमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले. यावल नगराध्यक्ष पदाच्या लढतीत चार उमेदवार रिंगणात आहेत भाजपा, महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये मुख्य लढत आहे.
दोन तारखेला मतदान झाल्यानंतर सर्व मतदान सील-पॅक झाल्यानंतर ईव्हीएम मशीन सील करून यावल येथील सातत्य रस्त्यावरील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये पोलीस हत्यारबंद सहा कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात, कडक पहाऱ्यात आणि सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी 24 तास निगराणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तरीसुद्धा पोलीस आणि प्रशासनावर अविश्वास दाखवत खबरदारी म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार छाया अतुल पाटील यांनी तीन खासगी सुरक्षा रक्षकांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक सुरक्षा रक्षक आठ तासांचा पहारा देतो. यात भर म्हणून, केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असताना भाजपाच्या उमेदवार रोहिणी उमाकांत फेगडे यांनीही दोन खासगी सुरक्षा रक्षक नेमून त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.
याला तहसीलदारांनी परवानगी दिली असली तरी सत्तेत असणारे लोकही प्रशासनावर आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास दाखवत नाहीत, असा चित्र स्पष्ट दिसत आहे. विरोधकांकडून आधीच ‘ईव्हीएम हॅकिंग’वरून जोरदार विरोध सुरू असताना, यावल ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आल्याने वातावरण अधिकच गढूळ झाले आहे.