

जळगाव : सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात खदानीत पाय घसरलेल्या मित्राला वाचवताना तीन मित्रांचा ३० फूट खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि.७) सायंकाळी अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळील खदानीत घडली.
नेमकी घटना काय?
मानव रतनानी, कार्तिक उधवानी आणि दिनेश पंजवानी हे तिघे मित्र मंगळवारी सायंकाळी चोपडा रस्त्यावरील खदानीवर गेले होते. या खदानीच्या मध्यभागी असलेल्या एका बेटासारख्या उंचवट्यावर ते पाण्यातून चालत गेले होते. तेथे सेल्फी काढत असताना एका मित्राचा अचानक पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्राने हात पकडला, तर त्याला सावरण्यासाठी तिसऱ्याने मदतीचा हात दिला. मात्र, त्यांचा तोल गेल्याने तिघेही ३० फूट खोल पाण्यात कोसळले आणि बुडाले.
नागरिक आणि प्रशासनाची धाव
ही घटना एका रिक्षाचालकाच्या निदर्शनास येताच त्याने धावत जाऊन खदानीजवळ मदत कार्य सुरू केले. त्याच वेळी उपस्थित एका व्यक्तीने तातडीने '११२' क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच देवडी येथील स्थानिक नागरिक, पोलीस निरीक्षक दत्तात्रय कारंडे, तहसीलदार सी. यू. पाटील, तलाठी अश्फाक पिंजारी आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी मोठ्या प्रयत्नांनंतर तिन्ही तरुणांना पाण्याबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशीर झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.