

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असून आज, मंगळवारीही अनेक तालुक्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, उमरखेड आणि कळंब तालुक्यात अंगावर वीज कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
कळंब तालुक्यातील उमरी येथील भीमराव रामभाऊ लाटकर (वय ५५) आणि निखिल वाल्मिक भोयर (वय ३२) अशी मृतकांची नावे आहेत. तर साहिल भीमराव लाटकर (वय २०) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हे तिघेही उमरी येथील वाल्मिक विठ्ठलराव भोयर यांच्या शेतात काम करत होते. आज मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू झाला आणि अचानक शेतात वीज कोसळल्याने भीमराव लाटकर व निखिल भोयर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर साहिल गंभीर जखमी झाला.
दुसरी घटना उमरखेड तालुक्यातील कुरळी ग्रामपंचायत हद्दीतील भोजूनगर तांडा शेतशिवारात घडली. सोमवारी दुपारी झालेल्या वादळी पावसादरम्यान विजेचा तडाखा बसून महेश गणेश आडे या तरुणाचा मृत्यू झाला. महेश आडे, त्याचे वडील गणेश फकिरा आडे (वय ५५) आणि काळू कनिराम पवार (वय ७०) हे तिघेही अमडापूर धरणालगतच्या शेतशिवारात जनावरे चरण्यासाठी गेले होते. दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास अचानक आकाश ढगांनी दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच वेळी विजांचा तीव्र धक्का बसून तिघेही होरपळले. या घटनेची माहिती मिळताच तांड्यातील नागरिक आणि परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करत तिघांनाही फुलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती महेश आडे याला मृत घोषित करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सवना येथे पाठवला.