

जळगाव : स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांमध्ये वाढणाऱ्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर खेळांचे महत्त्व अधिकच वाढले आहे. केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही खेळ अत्यावश्यक आहेत. खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि समूह नियोजन विकसित होते. त्यामुळे सरकार विशेष क्रीडा धोरण (स्पोर्ट्स पॉलिसी) तयार करत असल्याचे मत केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केले.
जैन हिल्स, जळगाव येथील अनुभूती मंडपममध्ये आयोजित ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. ११ वर्षांखालील मुला-मुलींसाठी ही स्पर्धा २ ते ८ ऑगस्ट दरम्यान स्वीग लीग पद्धतीने खेळवली जात आहे.
उद्घाटनप्रसंगी खासदार स्मिता वाघ, जैन इरिगेशनचे अध्यक्ष व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, तसेच आंतरराष्ट्रीय पंच देवाशीष बरूआ उपस्थित होते.
रक्षा खडसे व स्मिता वाघ यांनी बुद्धिबळ पटावर मोहरा चालवून (सेरीमोनियल फर्स्ट मूव्ह) स्पर्धेचे उद्घाटन केले. पाच वर्षांचा वल्लभ कुलकर्णी (छत्रपती संभाजीनगर) याच्यासोबत मंत्री खडसे यांनी बुद्धीबळाचा खेळाचा आनंद घेतला. त्यानंतर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
रक्षा खडसे म्हणाल्या, "बुद्धिबळामधून निर्माण होणारे नियोजन आणि एकाग्रता विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत. दिव्या देशमुख व कोनेरु हम्पी यांसारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवले असून, यामुळे भारताच्या बुद्धिमत्तेला जगभर दाद मिळते आहे."
येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त तीन दिवसीय प्रोत्साहनपर उपक्रम राबविण्याचे संकेतही खडसे यांनी यावेळी दिले.
अतुल जैन यांनी प्रास्ताविकेत देशभरातून आलेल्या खेळाडूंचे स्वागत केले. खासदार स्मिता वाघ यांनी जैन हिल्सच्या निसर्गरम्य ठिकाणी आलेल्या खेळाडूंना शुभेच्छा देताना, "जिंकून जा किंवा शिकून जा, पण जळगावच्या आठवणी घेऊन जा," असे सांगितले.
कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांनी सांगितले, स्पर्धेत लिंगभेद न करता समान पारितोषिक, तसेच विजयी, पराजित आणि बरोबरीत खेळणाऱ्या खेळाडूंनाही मूल्यांकनानुसार पारितोषिके दिली जातील, असे सांगितले. आंतरराष्ट्रीय पंच देवाशीष बरूआ यांनी स्पर्धकांसाठी तांत्रिक सत्र घेऊन नियमावली समजावून सांगितली.