

जळगाव : पेट्रोल पंप दरोडा प्रकरणातील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.१५) अटक केली. ही घटना ९ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० ते ११ च्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी सचिन अरविंद भालेराव (रा. भुसावळ), पंकज मोहन गायकवाड (रा. जुना सातारा रोड, भुसावळ) हर्षल अनिल बावस्कर (रा.बाळापुर जि. अकोला) देवेंद्र अनिल बावस्कर (रा. बाळापुर जि.अकोला) प्रद्युम्न दिनेश विरघट (रा. श्रद्धा नगर अकोला) व एक अल्पवयीन आरोपी यांना अटक करण्यात आली. यातील सचिन भालेराव हा या दरोडा प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात तीन पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली होती. यामध्ये राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपांवर ९ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० ते ११ च्या दरम्यान दरोडा पडला होता. यात १ लाख ३४ हजाराची रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. या प्रकरणातील सहाजणांना नाशिक व अकोला येथून अटक करण्यात आली. यामधील एक आरोपी अल्पवयीन आहे.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपी हे मूळ भुसावळमधील राहणारे असून त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी त्यांना तडीपार करण्यात आले होते. आरोपींकडून तीन गावठी पिस्तूल, पाच मॅक्झिन दहा जिवंत काडतूस, ९ मोबाईल जप्त करण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास बोदवड चौफुली येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या येथील रक्षा पंप व कर्की फाटा तसेच तळवेल येथील पंपावर अज्ञात मोटरसायकलवरील चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने पाच संयुक्त तपास पथके तयार करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे नाशिक येथून चार व अकोला येथून दोन जणांना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस उपनिरीक्षक रवी नरवडे, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वलटे, गोपाळ गव्हाणे, प्रेमचंद सपकाळे, उमाकांत पाटील यांनी केली.