

कोल्हापूर : शहरातील मध्यवर्ती न्यू शाहूपुरी येथील डॉक्टर अनिता अरुण परितेकर यांचा बंगला फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा 42 लाख 34 हजारांचा मुद्देमाल लुटणार्या आंतरराज्य टोळीतील तीन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले. टोळीकडून 36 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वेंकटेश रमेश (वय 23, रा. फर्स्ट क्रॉस, चलकेरे, ता. चलकेरे, जि. चित्रदुर्ग, सध्या रा. गंगोदनाहल्ली, बंगळूर), गिरीश वेंकटेश (बोंमवारा, ता. देवनहल्ली, जि. बंगळूर), रणजित रमेश (21, वेंकटेशनगर,चलकेरे, जि. चित्रदुर्ग, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयित गुन्हेगार कर्नाटकातील सराईत गुन्हेगार असून दरोडे, जबरी चोरी, लूटमारीसह विविध गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. पुण्यातही वाहन चोरीचे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, असेही ते म्हणाले.
कर्नाटकातील सराईत टोळीने न्यू शाहूपुरी येथील डॉ. अनिता परितेकर यांचा बंद बंगला फोडून सोन्या-चांदीचे दागिने, डायमंड, रोख रक्कम, महागडा मोबाईल असा 42 लाख 34 हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. उपनिरीक्षक संतोष गळवे, लखनसिंह पाटील, शुभम संकपाळ, सागर माने यांच्या पथकाने पाठपुरावा करून सराईत टोळीचा छडा लावला. सराईतांनी गुन्ह्यातील सोन्याच्या दागिन्यांची विक्री करून काही वाहनांची खरेदी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. कर्नाटकातील आंतरराज्य टोळीकडून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गंभीर गुन्ह्याचा छडा शक्य असल्याचे कळमकर यांनी सांगितले.