जळगाव : दिवाळीला काही दिवसच उरलेले असताना येथील सुवर्ण बाजारात सोन्यापाठोपाठ चांदीचे दर विक्रमी पातळीवर गेले आहेत. चांदीच्या दरात गेल्या आठ दिवसांमध्ये 25 हजार रुपयांची मोठी दरवाढ झाली आहे. जीएसटीसह चांदीचा दर प्रतिकिलो 1 लाख 85 हजार रुपयांवर गेला असून, सोन्याचा दर जीएसटीसह प्रति दहा ग्रॅम एक लाख 28 हजार रुपये झाला आहे.
सणासुदीमुळे वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत कमी पुरवठा यामुळे प्रामुख्याने चांदी भाव खाऊ लागल्याची माहिती स्थानिक सोने-चांदी विक्रेत्यांनी दिली. सध्या येथील सुवर्णबाजारात मौल्यवान धातूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे.
सोबतच पुणे शहरातील चांदीचा प्रतिकिलो दर एक लाख 75 हजार रुपयांवर गेला असून, वस्तू आणि सेवा करासह (जीएसटी) दर 1 लाख 80 हजार 250 रुपयांवर गेला आहे. 24 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव 1 लाख 24 हजार रुपये असून जीएसटीसह 1 लाख 27 हजार 720 रुपये मोजावे लागत आहेत. तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 15 हजार 400 रुपये असून, जीएसटीसह 1 लाख 18 हजार 862 रुपये मोजावे लागत आहेत.
देशपातळीवर एमसीएक्स या वायदेबाजारातही 9 ऑक्टोबरला चांदीचा प्रतिकिलो दर 1 लाख 58 हजार रुपये होता. त्यात सोमवारी (13 ऑक्टोबर) 1 लाख 71 हजार 85 रुपयांपर्यंत वाढ झाली. सोन्याचा 24 कॅरेटचा दहा ग्रॅमचा दर 320 रुपयांनी वाढून 1 लाख 25 हजार 400 रुपयांवर गेला असून, 22 कॅरेटचा दर 300 रुपयांनी वाढून 1 लाख 154 हजार 950 रुपयांवर गेला आहे.