

जळगाव : जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष यांना अपात्र ठरविण्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते अजय निकम यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या न्यायालयात दि. १९ जानेवारी रोजी सविस्तर याचिका दाखल केली आहे. नगराध्यक्षांनी निवडणूक नामनिर्देशन अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात खोटी, अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा गंभीर आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे शेंदूर्णी शहरासह सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर अर्जदार अजय निकम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर तक्रारीबाबत सविस्तर माहिती दिली.
अजय निकम यांनी सांगितले की, सन २०२५ च्या शेंदूर्णी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन अर्जासोबत दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सादर केलेल्या शपथपत्रात कायद्याने बंधनकारक असलेली अनेक महत्त्वाची माहिती जाणूनबुजून लपविण्यात आली आहे. ही माहिती खरी दिली असती तर मतदारांची दिशाभूल झाली नसती व निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता, असा दावा त्यांनी केला.
याचिकेनुसार, नगराध्यक्षांविरोधात जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा प्रलंबित असून, त्याची नोंद शपथपत्रात करण्यात आलेली नाही. संबंधित गुन्ह्यात दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होऊ शकते व अद्याप दोषमुक्तता झालेली नाही, असे अर्जात नमूद आहे. तसेच नगराध्यक्ष व त्यांच्या पत्नीच्या मालकीच्या शेंदूर्णी येथील घरमालमत्ता, सिटी सर्वे मिळकती, बिनशेती प्लॉट, शेतजमिनी व त्यातून होणारे शेती उत्पन्न शपथपत्रात शून्य दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्षात या शेतजमिनी लागवडीखाली असून त्यातून विविध पिकांद्वारे उत्पन्न मिळत असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे.
नगराध्यक्षांनी चालू वर्षाचा मालमत्ता कर न भरता शपथपत्रात कर थकबाकी नसल्याचे नमूद केल्याचा तसेच बिनशेती परवानगीसाठी शासनाचा नजराणा व महसूल बुडविल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. या संदर्भात नाशिक येथील अप्पर महसूल आयुक्तांकडे पुनरावलोकन अर्ज प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, शासनाच्या निधीचा गैरवापर करून स्वतःच्या मालकीच्या गट क्रमांक ६०८ मधील प्लॉटसाठी कॉनक्रिट रस्ते व पक्क्या नाल्या केल्याचा तसेच पत्नीच्या नगरसेवक पदाचा गैरफायदा घेतल्याचा गंभीर आरोपही अर्जात करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी जळगाव यांच्या न्यायालयात दि. १९ जानेवारी रोजी याचिका दाखल करण्यात आली असली, तरी अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रत्यक्ष कार्यवाही किंवा सुनावणी सुरू झालेली नाही. त्यामुळे नगराध्यक्षांच्या पात्रतेबाबत निर्माण झालेला हा पेच किती काळ चालतो आणि प्रशासन या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेते, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. या प्रकरणामुळे शेंदूर्णी नगरपंचायतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांचे लक्ष आता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लागले आहे. अर्जदार तर्फे ॲड श्रीकृष्ण देवतवाल आणि ॲड श्रीकृष्ण देवतवाल हे काम पाहत आहेत.
सर्व आरोप खोटे आहेत. ते राजकीय वैफल्यग्रस्त आहेत म्हणून काहीही खोटे आरोप करत आहेत. ते मला निवडणुकीमध्ये हरवू शकले नाहीत म्हणून असे प्रकार करत आहेत. त्यांना वैफल्य आलेले असल्याने ते असे अर्ज पाटेकर आहेत.
शेंदुर्णी नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल