Eknath Khadse | संकटसमयी कुणी आसरा दिला नाही; शरद पवारांनी मात्र आशीर्वादाचा हात ठेवला : एकनाथ खडसे

अमृत महोत्सवी सोहळ्यात एकनाथ खडसे भावूक; मुक्ताईनगरच्या जनतेचे मानले आभार
Jalgaon Eknath Khadse Amrut Mahotsav
एकनाथ खडसे यांच्या ७५व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे Pudhari
Published on
Updated on

Jalgaon Eknath Khadse Amrut Mahotsav

जळगाव : ‘माझा जन्म कोथळीसारख्या छोट्या गावात झाला. सरपंचापासून महाराष्ट्राच्या मंत्रिपदापर्यंतचा माझा प्रवास केवळ मुक्ताईनगरच्या जनतेच्या आशीर्वादामुळेच शक्य झाला,’ अशा भावना ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या ७५व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा आढावा घेताना अनेक राजकीय घडामोडींवरही भाष्य केले.

खडसे पुढे म्हणाले की, ‘जनतेतून सलग सात वेळा आमदार होणे आणि एवढ्या प्रदीर्घ काळानंतरही जनतेचे प्रेम कायम राहणे, ही मोठी गोष्ट आहे. राजकारणात वाद-प्रतिवाद होत असतात; मात्र राजकीय मतभेद असले तरी सामाजिक स्वास्थ्य बिघडू दिले नाही.’

Jalgaon Eknath Khadse Amrut Mahotsav
Eknath Khadse Birthday Celebration : भाजपा महाराष्ट्रात रुजवण्यात नाथाभाऊंचे योगदान अतुलनीय; शरद पवार

ग्रामपंचायत निवडणुकीपासून राजकीय प्रवासाला सुरुवात

१९७८ मध्ये कोथळी ग्रामपंचायत निवडणुकीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्याचे खडसे यांनी सांगितले. ‘सुरुवातीला पराभव पत्करावा लागला. पुनर्वसित गाव असल्याने अनेक समस्या होत्या. त्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. त्यानंतर सरपंच, पंचायत समिती सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली,’ अशी आठवण त्यांनी सांगितली.

जलसंपदा विभागात काम करताना सिंचन प्रकल्पांना गती

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री असताना कृष्णा खोरे, गोदावरी खोरे, विदर्भ आणि कोकण विकास महामंडळांच्या माध्यमातून सिंचन प्रकल्पांना गती दिल्याचे खडसे यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील बोदवड उपसा सिंचन योजना, चाळीसगाव परिसरातील प्रकल्प आणि वाघूर प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देत कामे पूर्णत्वास नेल्याचे त्यांनी नमूद केले.

‘या कामांसाठी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी मोलाची साथ दिली,’ असेही त्यांनी सांगितले.

Jalgaon Eknath Khadse Amrut Mahotsav
Eknath Khadse : एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी होणार?  मुनगंटीवारांच्या 'त्या' विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा

‘२०१४ पर्यंत राजकारणातील वातावरण निर्मळ होते’

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतील बदलावरही खडसे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘२०१४ पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय निर्मळ वातावरण होते. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय टीका-टिप्पणी होत असे; मात्र त्याचे रूप व्यक्तिगत वैरात कधीच बदलत नसे. राजकीय मतभेद असतानाही व्यक्तिगत संबंध जपले जात होते. मात्र सध्याच्या राजकारणात मोठा बदल झाला असून, तो बदल तुम्ही सर्वजण उघड्या डोळ्यांनी अनुभवत आहात.’

‘संकटाच्या काळात शरद पवारांनी आशीर्वादाचा हात ठेवला’

आपल्या राजकीय जीवनातील कठीण काळाचा उल्लेख करताना खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘अनेक वर्षे भाजपमध्ये निष्ठेने काम केले. मंत्री आणि आमदार म्हणून जनतेची सेवा केली. मात्र राजकीय जीवनात एक असा काळ आला, की सर्व काही उलथापालथ झाले. त्या अत्यंत कठीण प्रसंगी शरद पवारांनी मला केवळ आसरा दिला नाही, तर माझ्या पाठीवर आशीर्वादाचा हातही ठेवला.’

Jalgaon Eknath Khadse Amrut Mahotsav
Eknath Khadse News | आमदार एकनाथ खडसेंना मोठा दिलासा! कथित महार वतन जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

‘कोण आले, कोण गेले याची चिंता नाही’

आपल्यावर प्रेम करणारा मोठा जनसमुदाय आजही पाठीशी असल्याचे सांगत खडसे भावूक झाले. ‘माझ्यावर व्यक्तिगत प्रेम करणारा एवढा मोठा जनसमुदाय माझ्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे कोण आले आणि कोण गेले, याची मला अजिबात चिंता नाही. हा जनसागर नाथाभाऊंवर मनापासून प्रेम करतो, याचा मला सार्थ अभिमान आहे,’ असे त्यांनी सांगितले.

‘माझ्याकडून कधी कुठे चूक झाली असेल, तर मला माफ करा; मात्र माझ्यावरचे हे प्रेम कायम टिकवून ठेवा,’ अशी भावनिक साद घालत खडसे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news