

Jalgaon Amalner Taluka Shetkari Sangh
जळगाव : अमळनेर तालुका शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संभाजी लोटन पाटील (लोण) तर उपाध्यक्षपदी गणेश धर्मराज भामरे (बाम्हणे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने ही निवड केली.
अमळनेर तालुका शेतकी संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत सहकार पॅनलचे १०, काँग्रेस प्रणीत शेतकरी पॅनलचे ३ आणि भाजप प्रणीत किसान विकास पॅनलचे २ संचालक विजयी झाले होते. या निकालामुळे आमदार अनिल पाटील यांनी शेतकी संघावर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले असून सत्तेची सूत्रे त्यांच्या नेतृत्वाखाली राहिली आहेत.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक प्रक्रिया १९ जून रोजी सकाळी ११ वाजता शेतकी संघाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी सहकार पॅनलचे संचालक संजय पुनाजी पाटील, सचिन बाळू पाटील, विक्रांत पाटील, नितीन पाटील, रणजीत पाटील, शंकर बैसाने, सुषमा देसले, मालुबाई पाटील, शेतकरी पॅनलचे सुरेश पाटील, प्रा. शाम पवार तसेच किसान विकास पॅनलचे जितेंद्र पाटील आणि प्रफुल पवार उपस्थित होते.
निर्धारित मुदतीत सत्ताधारी गटाकडून केवळ संभाजी पाटील आणि गणेश भामरे यांचेच अर्ज दाखल झाल्याने त्यांची अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून धर्मराज पाटील, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी कामकाज पाहिले.
निवडीनंतर आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित अध्यक्ष संभाजी पाटील आणि उपाध्यक्ष गणेश भामरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्त्वाची असलेली संस्था जनतेने विश्वासाने आपल्या हाती सोपविली आहे. त्यामुळे संघाच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे.संघ अधिक सक्षम करण्यासाठी उत्पन्नवाढीवर भर देणे आवश्यक असून, शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केले, तर उपाध्यक्ष गणेश भामरे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, तिलोत्तमा पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष संभाजी पाटील हे सहकार पॅनलमधून निवडून आले असले तरी ते यापूर्वी काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे.