

Mahajan Photo Morph Claim
जळगाव : राज्याचे जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांचे व्हायरल झालेले आक्षेपार्ह फोटो एआयच्या आधारे मॉर्फ केल्याचा दावा मंत्री महाजन यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात जळगाव येथे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका फेसबुक अकाऊंटवरून मंत्री महाजन यांचे काही आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्यात आले. काही अज्ञात व्यक्तींनी एआय तंत्रज्ञानाद्वारे फोटो मॉर्फ करून प्रसारित केले आहेत.
सदर छायाचित्रांचा वास्तवाशी कोणताही संबंध नसून ते पूर्णपणे दिशाभूल करणारे व खोटे असल्याचा दावा महाजन यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात आला आहे. मंत्री महाजन यांनी स्वतः माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपली बदनामी करण्यासाठी अशा प्रकारचे गैरकृत्य केले गेल्याचे म्हटले आहे. बनावट छायाचित्र तयार करणे, प्रसारित करणे, शेअर करणे अथवा बदनामीकारक मजकूर पसरविणाऱ्या सर्व संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणात जळगाव येथे सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सतीश गोरडे करीत असून, संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच सोशल मीडियावर कोणतीही माहिती किंवा छायाचित्रे प्रसारित करण्यापूर्वी त्यांची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. मुंबईतही या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाणार आहे.