

Amravati Theft Gang Arrested in Jalgaon
जळगाव: शहरातील बस स्टॅण्ड मध्ये अमरावती येथील काही खिस्से कापणारे रेकॉर्ड वरील ३ गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली . त्यांच्याकडून ५ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज (दि.२६) करण्यात आली.
अहमद बेग कादर बेग (वय ६२, रा. मुजफ्फरपुरा, नागपुरी गेट पोलीस स्टेशन जवळ, अमरावती), हफिज शाह हबीब शाह (वय ४९, रा. बलगाव सकीनगर, अमरावती), अजहर हुसैन हफर हुसेन (वय ४९, रा. सुपिया मजिद समोर, रहमत नगर, अमरावती) अशी संशयितांची नावे आहेत.
एलसीबी चे प्रवीण भालेराव व अक्रम शेख यांना गोपनिय माहिती मिळाली की, जळगाव शहरातील बस स्टॅण्ड मध्ये अमरावती येथील काही खिस्से कापणारे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आले आहे .वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अक्रम शेख, नितीन प्रकाश बाविस्कर, प्रविण भालेराव, किशोर पाटील, रविंद्र कापडणे यांच्या पथकाला शहरातील बस स्टॅण्ड परिसरात पेट्रोलींग करण्यासाठी पाठविले.
पोलीस अधिकारी व अंमलदार बस स्टॅण्ड परिसरात पेट्रोलींग करीत असताना ३ संशयित गर्दीच्या फायदा घेवून चोरी करण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांनी २४ जूनरोजी जळगाव बस स्टॅण्डमध्ये बस मध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाच्या खिशातील १०० रुपयांची दोन बंडल चोरल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून ३३ हजार ८३० रुपये रोख, १७ हजार ५०० रुपये किंमतीचे ५ मोबाईल, ०१ रेक्झीन बॅग, ५ लाख किंमतीची ०१ टाटा इंडिका व्हिस्टा कार असा एकूण ५ लाख ५१ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी अहमद बेग कादर बेग (वय ६२, रा. मुजफ्फरपुरा नागपुरी गेट पोलीस स्टेशन जवळ अमरावती) याच्या विरुध्द अमरावती शहरात विविध पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल आहेत.