जळगाव : शहरात वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांवर लक्ष ठेवून एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३३ मोबाईल जप्त करण्यात आले असून, एक आरोपी आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी परिसरातील बाजार पट्ट्यात गस्त घालत असताना पोलीस पथकाला एक तरुण व दोन अल्पवयीन मुले संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांच्याकडून ४ मोबाईल जप्त करण्यात आले. पुढील चौकशीत आरोपींनी उघडकबुल केले की, उर्वरित मोबाईल त्यांनी स्वामीनारायण मंदिराजवळील शेतात, एका झाडाजवळ खड्डा करून पुरले आहे. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून एका पिशवीतून अंदाजे ४ लाख ९ हजार रुपये किमतीचे एकूण ३३ मोबाईल हस्तगत केले. प्राथमिक तपासात या मोबाईलची चोरी शनिवार बाजार व जिल्ह्यातील विविध बाजारपेठांतून झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित आरोपी नोरसिंह गुजरिया (वय २३, रा. इंदोर, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव करीत आहेत.
जप्त केलेल्या मोबाईल पैकी ८ मोबाईल हे रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ते मोबाईल रावेर पोलीस अंमलदार महेश मोगरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील आणि शहरातील ज्यांचे मोबाईल चोरीस गेले असतील त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा आपल्या मोबाईलचा IMEI क्रमांक तपासून अधिक माहितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.