‘राऊत आयुष्यभर उपाशीच; सुनेत्रावहिनींचे काम पाहून पोटात दुखतंय!’

अनिल पाटलांचा संजय राऊतांवर घणाघाती हल्ला; ‘भाजपने व्यासपीठ सोडले तरी गुलाबरावांच्या पाठीशी ठाम’
Anil Patil Slam Sanjay Raut
Anil Patil Slam Sanjay RautPudhari
Published on
Updated on

Anil Patil Slam Sanjay Raut

जळगाव : “आयुष्यभर उपाशी राहिलेल्या संजय राऊतांनी कुठे खाल्लं-पिलेलं मला आठवत नाही. सुनेत्रावहिनींची धडाकेबाज कामगिरी पाहूनच त्यांच्या पोटात दुखत आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार अनिल पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. जळगावात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आरक्षण, विजय वडेट्टीवार यांची भूमिका, गणेशोत्सवातील डीजेचा दणदणाट तसेच महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर भाष्य केले.

‘सुनेत्रावहिनींच्या कामाची विरोधकांना पोटदुखी’

राज्य सरकार महाराष्ट्राची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावण्यासाठी काम करत असताना संजय राऊतांना ते पाहवत नसल्याचा टोला आमदार पाटील यांनी लगावला. “अजितदादांनंतर पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी सुनेत्रावहिनी आमचा भक्कम आधारस्तंभ आहेत. अवघ्या सात-आठ महिन्यांत त्यांनी राज्यभरातील आमदारांचा आढावा घेत शेतकरी आणि जनतेला न्याय देण्याचे काम केले. राऊतांना याच कामाची पोटदुखी आणि वेदना होत आहेत,” असे ते म्हणाले.

Anil Patil Slam Sanjay Raut
Jalgaon Bypass News | बायपासच्या निकृष्ट कामाचा फटका; सहा जळगावकरांचा मृत्यू, वारसांना सहा लाखांची भरपाई देण्याची मागणी

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदलण्याच्या चर्चेबाबत विचारले असता, “तुमचा सल्ला घेऊनच ठरवेन; पण अजून तुमचा तसा सल्ला आलेला नाही,” असे म्हणत त्यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

‘जरांगेंच्या संघर्षाचे राजकारण करू नये’

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. “अजितदादा असतानाही आणि आताही राष्ट्रवादी काँग्रेस मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. सरकारने लाखो विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्याचे काम केले आहे,” असे ते म्हणाले.

Anil Patil Slam Sanjay Raut
Jalgaon News : न्हाईच्या ठेकेदाराचे कामाकडे दुर्लक्ष का? अधिकारी-ठेकेदाराच्या ‘साटेलोट्या’चा संशय; तरसोदजवळ जीवघेणे खड्डे

विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना त्यांनी जरांगे यांच्या संघर्षाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. “मराठा समाजाने आपल्या वेदना आणि भावना मांडल्या, तर त्याला धमकी म्हणण्याचे कारण नाही. मराठा समाजाचा कार्यकर्ता धमकी देण्याचे काम करत नाही,” असे पाटील यांनी सांगितले.

‘भाजप निघून गेली तरी गुलाबरावांसोबतच’

जळगावातील एका शासकीय कार्यक्रमात भाजपचे खासदार आणि आमदार भाषणे आटोपून निघून गेल्याच्या घटनेवरही पाटील यांनी भाष्य केले. “पालकमंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी असताना भाजपचे लोकप्रतिनिधी निघून गेले असतील, तरी मी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे. भाजपचे व्यासपीठ असले तरी आम्ही पालकमंत्र्यांची साथ सोडणार नाही. युतीधर्म शेवटपर्यंत पाळू,” असे त्यांनी स्पष्ट केले. “गुलाबभाऊ अस्वस्थ आहेत की नाही, हे त्यांनाच विचारा,” असा टोलाही त्यांनी लगावला.

Anil Patil Slam Sanjay Raut
Jalgaon News : न्हाईच्या ठेकेदाराचे कामाकडे दुर्लक्ष का? अधिकारी-ठेकेदाराच्या ‘साटेलोट्या’चा संशय; तरसोदजवळ जीवघेणे खड्डे

‘डीजेच्या आवाजाने घरे भूकंपासारखी हादरतात’

गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरही पाटील यांनी भाष्य केले. गणेश मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करूनच उत्सव साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले. “डीजेच्या दणदणाटामुळे माणसांसह घरे आणि जमीन भूकंपासारखी हादरल्यासारखी वाटते. त्यामुळे अशा त्रासाला नागरिकांचा विरोध होणारच. नियमांचे पालन करूनच सण साजरे करावेत,” असे ते म्हणाले.

राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या प्रकरणांबाबत बोलताना सरकार आणि पोलीस यंत्रणा सक्षमपणे कारवाई करत असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रश्नासाठी केवळ सरकारच नव्हे, तर नागरिकही जबाबदार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news