

Jalgaon crime news excise raid
जळगाव: जिल्ह्यात स्वतंत्र राज्य उत्पादन शुल्क विभाग, विशेष भरारी पथक आणि निरिक्षकांची मोठी फौज तैनात असतानाही अवैध धंद्यांची माहिती मात्र थेट मुंबईच्या पथकाला मिळावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जळगावचे स्थानिक उत्पादन शुल्क पथक झोपेचे सोंग घेऊन बसले आहे का, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. नुकतीच पोलिसांनी अवैध दारूच्या भट्ट्यांवर धडक कारवाई केली असताना, आता थेट राज्य उत्पादन शुल्क, मुंबईच्या भरारी पथकाने चोपडा तालुक्यात छापा टाकून १८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी मुंबईच्या भरारी पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत पक्की माहिती मिळाली. त्यानुसार, चोपडा तालुक्यातील मुळयावतार (पो. वैजापूर) येथील एका विटा-सिमेंटच्या पक्क्या गाळ्यात छापा टाकण्यात आला. या छाप्यात अवैध स्पिरीटपासून तयार केलेला देशी ब्लेंडचा साठा, 'बॉबी संत्रा' नावाच्या बनावट सिलबंद बाटल्या, बनावट पत्र्याची बुचे, लेबल्स, रिकाम्या बाटल्या, कागदी बॉक्स, पाणी ओढण्याची मोटर, पाण्याच्या टाक्या आणि एक स्वयंचलित सीलिंग मशीन, असा एकूण १८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, जप्त केलेल्या बाटल्यांवर 'महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता' असे बनावट लेबल लावून ही विषारी व बनावट दारू राज्यभरात खपवण्याचा मोठा कट होता. स्थानिक निरीक्षकांच्या नाकाखाली एवढा मोठा कारखाना सुरू असताना जळगावच्या पथकाला याचा सुगावा कसा लागला नाही? की राजकीय व प्रशासकीय वरदहस्तामुळे स्थानिक पथक हात बांधून गप्प बसले होते? असा घणाघाती प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार, सह-आयुक्त (अं. व द.) प्रसाद सुर्वे, भरारी पथकाचे उप अधीक्षक रवींद्र उगले, निरीक्षक रियाज खान आणि विजयकुमार थोरात यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक रुपेश चव्हाण आणि फिर्यादी जवान विकास गायकवाड यांच्यासह पथकातील उदय अनंत शिंदे, नवनाथ घोडके, राहुल भगत, दिलीप नागरे, राजाराम सोनवणे, विजय ढवळे, आरती धोंगडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. कारवाईदरम्यान चोपडा विभागाचे निरीक्षक अ. कै. सु. मोमिन व जवान भूषण परदेशी सोबत होते. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींचा शोध आता मुंबईचे पथक घेत आहे.