

Jalgaon Student Aakrosh Morcha Collector Office
जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात आणि स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ खान्देशातील हजारो विद्यार्थ्यांनी बुधवारी (दि. ९) जळगावात ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ काढला. जी. एस. मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात संताप व्यक्त केला.
स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकार, संशयास्पद निकाल आणि परीक्षांच्या पेपर तपासणीतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
१. अध्यक्ष, सचिवांचा राजीनामा : MPSCचे अध्यक्ष आणि सचिवांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी स्वच्छ प्रतिमेच्या IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
२. गट-ब परीक्षेतील आक्षेपांची चौकशी : गट-ब परीक्षेबाबत नोंदवलेल्या आक्षेपांवर आयोगाने आठ दिवसांत स्पष्टीकरण द्यावे आणि कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करावी.
३. पेपर तपासणीतील त्रुटींची चौकशी : राज्यसेवा मुख्य तसेच कृषीसेवा परीक्षेच्या वर्णनात्मक पेपर तपासणीतील त्रुटींची तातडीने चौकशी करावी.
४. क्राईम ब्रांचचा अहवाल जाहीर करावा : मुंबई क्राईम ब्रांचने MPSCला सादर केलेला प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक करावा.
५. संशयित अधिकाऱ्यांची चौकशी : संशयित अधिकाऱ्यांच्या संपूर्ण सेवाकाळाची चौकशी करून त्यांच्या पदोन्नती प्रक्रियेचीही तपासणी करावी.
६. CDR तपासणी : संशयित अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या तसेच विविध परीक्षांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कॉल डिटेल्सची चौकशी करावी.
७. एजंट-दलालांवर कारवाई : परीक्षा गैरप्रकारांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या एजंट आणि दलालांचे जाळे उध्वस्त करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.
८. औषध निरीक्षक परीक्षेचे फॉरेन्सिक ऑडिट : ‘औषध निरीक्षक’ परीक्षेतील संशयास्पद निकाल आणि उत्तीर्ण उमेदवारांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे.
९. गट-क परीक्षा पारदर्शकपणे घ्यावी : २६ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी गट-क पूर्व परीक्षा पूर्णपणे पारदर्शक वातावरणात घेण्यात यावी.
१०. ऑफलाइन परीक्षांचा आग्रह : आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व भरती परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात.
११. राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपात घ्यावी : राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीऐवजी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात यावी.
हातात मागण्यांचे फलक घेत आणि घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी प्रशासनासमोर आपला रोष व्यक्त केला. मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करून ते राज्यव्यापी करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.