

जळगाव : 'प्रति पंढरपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत मंदिराचे मोठे नुकसान झाले असले, तरी मंदिरातील देवमूर्ती सुदैवाने सुरक्षित राहिल्या आहेत. आग विझवण्यासाठी प्रशासन, अग्निशमन दल, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी युद्धपातळीवर मदतकार्य राबवले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ह.भ.प. प्रसाद महाराज संत सखाराम महाराजांची पालखी (दिंडी) घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले होते. दरम्यान, रात्रीच्या सुमारास मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेजवळ शॉर्ट सर्किट झाले आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावरील बैठकीच्या खोलीत आग लागली. मंदिराचे लाकडी बांधकाम आणि तेथील रंगकामामुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले.
युद्धपातळीवर मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच अमळनेर आणि पारोळा येथील अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक, खाजगी टँकर आणि पाणी पुरवठा करणाऱ्या वाहनांच्या साहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. बोरी नदीच्या दोन्ही काठांवर असलेल्या चांगल्या रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचणे सोपे झाले, ज्यामुळे मदतकार्याला गती मिळाली.
प्रशासकीय स्तरावर उपविभागीय अधिकारी (प्रांत) मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आमदार अनिल पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चोपडा, शिरपूर आणि पारोळा येथून अतिरिक्त अग्निशमन गाड्यांची मागणी केली होती. तसेच, मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनीही अग्निशमन दलाला तातडीने रवाना करत प्रत्यक्ष पाहणी केली.
दिंडी मार्गस्थ; मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद
पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीचे नेतृत्व करत असलेले ह.भ.प. प्रसाद महाराज यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी भाविकांच्या श्रद्धेला प्राधान्य देत, आपली दिंडी नियोजित मार्गाने पुढे सुरू ठेवली. महाराजांच्या या संयमी भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, वाडीचे नुकसान पाहता मंदिराच्या इमारतीची संरचनात्मक तपासणी (Structural Audit) पूर्ण होईपर्यंत मंदिर भाविकांसाठी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय संस्थांनतर्फे घेण्यात आला आहे.