

जळगाव : मुंबईत सुरू असलेले मराठा आंदोलन सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर मागे घेण्यात आले. मात्र, मराठा समाजाला देण्यात येणारे आरक्षण हे ओबीसी समाजाच्या कोट्यातून देऊ नये, या मागणीसाठी बुधवार (दि.3) रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाने आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी ओबीसींच्या "जय ज्योती, जय क्रांती" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, पण ते ओबीसी कोट्यातून देऊ नये.
सध्या ओबीसींना अल्प कोट्यातून 374 जातींना लाभ मिळतो. त्यात मराठ्यांना सामावल्यास ओबीसींचे आरक्षण नावापुरते उरेल.
मराठा समाजाला हवे असल्यास त्यांनी ओबीसींच्या कोट्यात न शिरता न्यायालयीन लढाई लढावी.
सरकारने सब-जीआर काढून अन्याय करू नये.
समता परिषदेने स्पष्ट इशारा दिला की, जर मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
आमचे आरक्षण हिसकावून घेतले जाणार असेल, तर आम्हाला आक्रमक व्हावेच लागेल. आम्ही न्यायालयीन लढाई लढतो, तसेच मराठा समाजानेही लढाई लढावी.
निवेदिता ताठे, सामाजिक कार्यकर्त्या
यावेळी दीपक पंडीत माळी, संतोष बळीराम माळी, डॉ. सुतिन देतेरे, संतोष पाटील, राजेंद्र चौधरी, डॉ. एम. बी. सैनी, वसंत पाटील, किशोर सूर्यवंशी, विजय वानखेडे, विजय लोहार, अमोल कोल्हे, रवींद्र माळी, संतोष इंगळे, गोकुळ महाजन, अभिलाषा रोकडे आदींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.