

जळगाव
छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर कुसुंबा बस स्थानकाजवळ रविवारी रात्री भरधाव वेगातील एका 'बेलगाम' बोलेरो पिकअपच्या चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या ४२ वर्षीय मजुरास जोरदार धडक दिली. इतकेच नव्हे, तर जखमीला रक्ताच्या थारोळ्यात सोडून या नराधम चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला; मात्र गावच्या पोलीस पाटलांच्या सतर्कतेमुळे एमआयडीसी पोलिसांनी या चालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
जखमी तरुण सध्या आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील लोटन जलम पाटील (वय ६५) यांचा मुलगा समाधान लोटन पाटील (वय ४२) हा पाईप कंपनीत काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. रविवारी ११ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास समाधान हा कुसुंबा बस स्टँडजवळ रस्ता ओलांडत होता.
त्याचवेळी नेरीकडून जळगावकडे जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप क्र. एम एच 28 बी बी -5026 चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत गाडी सुसाट वेगात चालवली होती. धडक इतकी जबरदस्त होती की समाधानच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याचे नाक आणि तोंडातून रक्तस्राव सुरू झाला आणि बरगड्यांनाही मार लागला. माणुसकी दाखवण्याऐवजी चालकाने गाडी न थांबवता अंधारात पळ काढला.
पोलिस पाटलांच्या फोनने फिरली चक्रे
घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि जखमीचा भाऊ विनोद याने गाडीचा नंबर टिपला होता. त्याने तत्काळ गावचे पोलीस पाटील राधेशाम चौधरी यांना माहिती दिली. चौधरी यांनी क्षणाचाही विलंब न लावता एमआयडीसी पोलिसांना फोन खणखणला. पोलिसांनी नाकाबंदी करून त्या बोलेरो चालकाला पकडले. निलेश रत्नाकर लोढे (वय ३१, रा. वरखेड, ता. मेहकर, जि. बुलढाणा) असे चालकाचे नाव आहे.
दरम्यान, जखमी समाधानला रक्ताच्या थारोळ्यातून उचलून जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. याबाबत वडील लोटन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.