

Jalgaon administration preparations Kumbh Mela
जळगाव: धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने जळगाव जिल्हा प्रशासनाने 'मिशन मोड'वर तयारी सुरू केली आहे. आज (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिकचे आयुक्त शेखर सिंह, यांच्या दूरचित्रवाणी परिषदेनंतर लगेचच, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकारी घुगे यांनी यावेळी स्पष्ट केले की, "कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो व्यवस्थापन, वाहतूक, आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. जळगाव जिल्ह्याने या दृष्टीने आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवावे.
रेल्वे आणि विमानतळ विस्तारीकरण: जळगाव शहराला कुंभमेळ्यासाठी 'गेटवे' बनवण्याच्या उद्देशाने रेल्वे आणि विमानतळ सुविधा विस्तारावर विशेष लक्ष देण्यात आले. भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापकांशी समन्वय साधून रेल्वे वाहतूक व सुविधा वाढवण्यासाठीच्या अडचणी त्वरित दूर करण्यावर भर दिला गेला. तसेच, विमानतळ संचालक हर्ष त्रिपाठी यांनी विमानतळ सेवा, एअरलाईन्स कनेक्टिव्हीटी आणि विस्तारीकरणाच्या प्रस्तावावर काम सुरू असल्याची माहिती दिली. यामुळे जळगावची कनेक्टिव्हिटी वाढून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भाऊसाहेब साळुंखे यांनी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची स्थिती सुधारणे, दुरुस्ती व सुधारणा कामांची प्रगती त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यामुळे नाशिककडे होणारी वाहतूक जलद व सुरक्षित होईल. याशिवाय, विभागीय नियंत्रक (MSRTC) दिलीप बंजारा यांनी कुंभमेळा कालावधीसाठी नाशिकसाठी नियमित आणि जादा बससेवांच्या वाहतुकीचे नियोजन सुरू केले असल्याचे सांगितले.
आरोग्य सेवा दवाखाने, आरोग्य केंद्रे, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा अद्ययावत करण्यावर भर देण्यात आला. तसेच, मोठ्या मनुष्यबळ मागणीसाठी उपलब्धता व प्रशिक्षण नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
अपर पोलीस अधीक्षक . अशोक नखाते यांनी संभाव्य गर्दी आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलीस प्रशासन व सुरक्षा बंदोबस्त अधिक मजबूत करण्याच्या तयारीचा आढावा सादर केला.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील यासह सर्व प्रमुख अधिकारी बैठकीस उपस्थित होते. सहकार्य, समन्वय आणि नियोजनाच्या बळावर कुंभमेळा २०२७ यशस्वी करण्याची जळगाव जिल्हा प्रशासनाची सामूहिक कटिबद्धता या बैठकीतून दिसून आली. जळगाव जिल्ह्यासाठी हा केवळ एक कार्यक्रम नसून, व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाची एक मोठी संधी आहे, या दृष्टीने प्रशासन काम करत आहे.