Jalgaon News : जळगाव विभागाच्या उत्पादन शुल्क कारवाईच्या आकडेवारीत धक्कादायक तफावत
जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन वर्षांच्या तुलनात्मक आकडेवारीत जळगाव जिल्ह्यातील मुख्य विभागाची कामगिरी मोठ्या प्रमाणात घसरल्याचे समोर आले आहे. काही विभागांनी उत्तम कामगिरी करत अवैध धंद्यांवर प्रभावीपणे कारवाई केली असताना, ‘जळगाव’ विभागाने मात्र जप्त केलेल्या मुद्देमालात तब्बल ७६ टक्क्यांची घट नोंदवली आहे.
गेल्या वर्षी जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागात २२० गुन्हे दाखल झाले होते आणि १.१९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र यंदा या संख्येत घट झाली असून संख्या १८५ गुन्ह्यांवर आली आहे, असे असूनही जप्त मुद्देमालाचे मूल्य फक्त २८.४५ लाख रुपये आहे. म्हणजेच ९१ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल कमी प्रमाणात जप्त झाला असल्याचे समोर येत आहे. ही मोठी घट विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे चित्र आहे.
भुसावळ आणि चाळीसगाव विभागांच्या गुन्ह्यांच्या संख्येत किरकोळ फरक असला तरी, दोन्ही विभागांनी जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किमतीत मात्र घट दिसून आली आहे. भुसावळ ३.६४ टक्के घट चाळीसगाव २०.९९ टक्के घट पूर्णाड फाटा चेक पोस्टवर मागील वर्षी १४३ गुन्हे दाखल असून २०२५ मध्ये या गुन्ह्यांची संख्या ३७ वर आल्याचे दिलासादायक चित्र आहे. मात्र जप्त मुद्देमालाची जप्ती ही ७५.३४ टक्क्यांनी घटली आहे. एकीकडे चोपडा आणि चोरवडसारखे विभाग अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत आहेत, तर दुसरीकडे मुख्य जळगाव विभागाने ७६ टक्के इतकी मोठी घसरण नोंदवणे गंभीर आहे. यामुळे 'जळगाव' विभागाच्या कार्यक्षमतेवर तसेच या विभागात अवैध दारूविक्री आणि तस्करी वाढली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाने या आकडेवारीची गंभीर दखल घेऊन जळगाव, भुसावळ, चाळीसगाव आणि पूर्णाड फाटा या विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्याची आणि कामगिरी सुधारण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
याउलट, चोपडा विभागाने आणि चोरवड चेक पोस्ट हद्दीत गुन्ह्यांची संख्येत वाढ झाल्याचे चित्र असून चोपडा विभागात मागील वर्षी ३२ गुन्हे दाखल होते ते २०२५ यावर्षी तब्बल २०७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या मागील वर्षी २.५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता, तो यंदा वाढून ३६ लाख १ हजार ३५ रुपये इतका झाला आहे. दोन वर्षांच्या तुलनेत तब्बल १,२९९.९८ टक्के अधिक किमतीचा मुद्देमाल या विभागातून जप्त करण्यात आला आहे. चोरवड चेक पोस्टने गेल्या वर्षीपेक्षा २१६६.३१ टक्के अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

