

Missing Child Murder Case in Yawal
यावल : यावल शहरातील बाबूजी पुरा भागात राहणारा एक ६ वर्षीय बालक शुक्रवारी (दि.५) सायंकाळी बेपत्ता झाला होता. या बालकाचा मृतदेह आज (दि.६) शेजारील घरात एका कोठीत आढळून आल्याने खळबळ उडाली. हा प्रकार उघडकीस आल्या नंतर मोठ्या संख्येने संतप्त जमाव बाबुजी पुरा येथे दाखल झाला. तर मारेकरीच्या दुकानावर दगडफेक करण्यात आल्याने शहरातील दुकाने बंद करण्यात आली. तर दंगा नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले.
शहरातील बाबुजीपुरा भागातील रहिवाशी मो.हन्नान खान मजीद खान (वय ६) हा मजीद खान जनाब यांचा मुलगा शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपासून बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. नातेवाईकांकडे तपास केला. मात्र, तो कुठेच मिळून आला नव्हता. दरम्यान आज सकाळी ११ च्या सुमारास बालकाचा मृतदेह त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या बिस्मिल्ला खलीफा दस्तगीर खलीफा यांच्या दुमजली घरातील वरच्या मजल्यावर एका कोठीत मिळून आला.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली व घटनास्थळी प्रचंड जमाव एकत्र झाला. जमावास शांत करण्याकरीता हाजी शब्बीर खान, डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे, शरद कोळी, सहायक पोलिस निरीक्षक अजय वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलिस उपनिरीक्षक एम.जे.शेख, अयाज खान तसेच मुस्लिम समाजातील मान्यवरांनी प्रयत्न केले मात्र, जमाव शांत झाला नाही.
संतप्त जमावाने खलीफा यांच्या मेन रोडवरील बारी चौकाच्या अली कडे असलेल्या दुकानावर दगडफेक केली. या घटनेनंतर शहरातील व्यवसायिकांनी खबरदारी म्हणून आपआपली दुकाने बंद केली. तसेच दंगा नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले. फॉरेंन्सिकचे पथक येथे दाखल होत आहे. शहरात सध्या तणावाचे वातावरण आहे. शहरातील बाबुजी पुरा भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.