

जळगाव : महिलांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग हा केवळ त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीच नव्हे, तर आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक समावेशासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले.
सीआयएसई नॅशनल प्री-सुब्रोतो कप 2025 अंतर्गत 17 वर्षाखालील महिलांच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि.2) अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर झालेलया उद्घाटनप्रसंगी डॉ. माहेश्वरी बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन होते. यावेळी सीआयएसईच्या मुंबई विभागाचे क्रीडा समन्वयक सिद्धार्थ किलोस्कर, सीआयएसई बोर्डचे सहसचिव अर्जित बसू, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, तसेच प्राचार्य देबाशीस दास उपस्थित होते.
डॉ. माहेश्वरी यांनी ध्वजारोहण करून उद्घाटन सोहळ्याची सुरुवात केली. यावेळी अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी "आरंभ है प्रचंड है" या जोशपूर्ण गीतावर सादर केलेले नृत्य विशेष आकर्षण ठरले. अर्जित बसू यांच्या नेतृत्वाखाली सर्व खेळाडूंनी सामूहिक शपथ घेतली. त्यानंतर डॉ. माहेश्वरी आणि अशोक जैन यांच्या हस्ते स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. औपचारिक मशाल प्रज्वलन देखील डॉ. माहेश्वरी यांनी करून ती साची पाटील यांच्या स्वाधीन केली, ज्यामुळे स्पर्धेची अधिकृत सुरुवात झाली. यावेळी विविध राज्यांतील शाळांनी सहभाग घेतलेली मार्चपास्ट परेड ‘विविधतेत एकता’ या भारतीय तत्त्वाचे दर्शन घडवणारी ठरली.
एकलव्य स्कूल, अहमदाबाद (गुजरात), रामकृष्ण मिशन स्कूल, जमशेदपूर (झारखंड), ग्रीनवुड हायस्कूल, बेंगळुरू (कर्नाटक), बिशप स्कूल, उंद्री (महाराष्ट्र), संत बाबा हरीसिंग शाळा (पंजाब), सेंट मायकेल्स स्कूल, चेन्नई (तमिळनाडू), सेठ एम. आर. जयपूरिया स्कूल, लखनौ (उत्तर प्रदेश) कोलकाता येथील शाळा यांमध्ये समावेश होता. तर सेंट जोसेफ स्कूल, हैदराबाद (तेलंगणा) ही शाळा पुढील स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे.