

Gold stolen in Jalgaon
जळगाव : एकीकडे लग्नसराईची धामधूम सुरू असताना दुसरीकडे चोरट्यांनीही आपले हात साफ करण्यास सुरुवात केली आहे. एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे एका किराणा दुकानदाराचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. घरमालक पुतणीच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी हा डल्ला मारला असून, याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव येथील रहिवासी आणि किराणा दुकान चालक संभाजी युवराज पाटील (वय ४५) हे आपल्या पुतणीच्या लग्नासाठी २८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गुढे (ता. भडगाव) येथे गेले होते. घर बंद असल्याची खात्री पटताच अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर अत्यंत चलाखीने फोडून त्यातील ६ हजार रुपयांच्या कानातील सोन्याच्या बाळ्या, २४ हजार रुपयांचे सोन्याचे मणी आणि ३ हजार रुपयांचे 'ओमपान' असा एकूण ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. पोना अकील खलील मुजावर हे पुढील तपास करत आहेत.
झुरळ तांड्यातील घटना; रोख १ लाख रुपयांसह सोन्या-चांदीवर चोरट्यांचा डल्ला
पाचोरा तालुक्यातील झुरळ तांडा येथे एका महिलेच्या घरातील पेटी फोडून चोरट्यांनी १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. लग्नासाठी दागिने काढायला गेलेल्या फिर्यादीला पेटी उचकलेली दिसताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवकाबाई किसन राठोड (वय ५५, रा. झुरळ तांडा) या लग्नाला जाण्यासाठी घरातील सामानाची आवराआवर करत होत्या. त्यांनी पेटीचे कुलूप उघडून पाहिले असता, त्यांना धक्काच बसला. पेटीतील १ लाख रुपये रोख, १५ हजार रुपये किमतीचे चांदीचे कडे आणि ५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज गायब होता. पेटी एका बाजूने उचकटलेली असल्याचे दिसून आल्याने चोरी झाल्याची खात्री पटली.
होळीच्या दुसऱ्या दिवसापासून ते २२ एप्रिल दरम्यान ही चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घरात शोध घेऊनही काहीच न मिळाल्याने अखेर राठोड यांनी पोलिसात धाव घेतली. या घटनेमुळे तांडा परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोहेकॉ तात्याबा सिव्हिल रूल्स हे या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.