

जळगाव: जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापू लागले आहे. निवडणूक नामनिर्देशन पत्र विक्रीच्या पहिल्याच दिवशी इच्छुकांची जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलीच धावपळ उडाली. महायुती (भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी) किंवा महाविकास आघाडी (ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस) मधील कोणत्याही बड्या नेत्याने किंवा पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही. असे असतानाही पहिल्याच दिवशी १६ जणांनी तब्बल २६ नामनिर्देशन पत्रांची खरेदी केली आहे.
उमेदवारी निश्चित नसतानाही पहिल्याच दिवशी झालेल्या या 'फॉर्म' खरेदीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले असून, प्रशासनाने मात्र अर्ज नेणाऱ्यांची नावे जाहीर करण्यास नकार दिल्याने या सस्पेन्समध्ये आणखीनच भर पडली आहे.
विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील अनेक स्थानिक नेते पडद्यामागून जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. पक्षाकडून तिकीट मिळो ना मिळो, ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून अपक्ष किंवा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याची तयारी या इच्छुकांनी सुरू केल्याचे दिसत आहे. पहिल्या दिवशी १६ व्यक्तींनी 26 अर्ज नेल्यामुळे अनेकांनी एकापेक्षा जास्त अर्ज खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
नेहमी निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून अर्ज खरेदी करणाऱ्यांची किंवा दाखल करणाऱ्यांची नावे जाहीर केली जातात. मात्र, या निवडणुकीत अर्ज नेमके कोणी घेतले? कोणत्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी घेतले? याबाबत निवडणूक प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला.
गोपनीयतेचे कारण काय?
"अर्ज केवळ खरेदी केले आहेत, ते अद्याप दाखल झालेले नाहीत. जोपर्यंत उमेदवार अधिकृतपणे अर्ज भरून अनामत रक्कम (डिपाझिट) जमा करत नाही, तोपर्यंत ही माहिती सार्वजनिक करता येत नाही," अशी भूमिका प्रशासकीय सूत्रांनी घेतली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे 'ते सोळा जण कोण?' यावरून जळगाव आणि भुसावळच्या राजकीय कट्ट्यांवर आता पैजा लागण्यास सुरुवात झाली आहे.
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी दोन्ही बाजूंकडे इच्छुकांची मोठी भाऊगर्दी आहे. जळगाव हा नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि चुरशीचा जिल्हा राहिला असल्याने, इथली जागा पदरात पाडून घेण्यासाठी मुंबईत वरिष्ठ पातळीवर खलबते सुरू आहेत. जागावाटपाचा तिढा सुटत नाही आणि हायकमांडकडून नावावर शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत कोणीही उघडपणे समोर येण्यास तयार नाही. मात्र, पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता इच्छुकांनी आपले मोहरे पुढे करून अर्ज पदरात पाडून घेतले आहेत, हे मात्र पहिल्या दिवसाच्या आकड्यांवरून सिद्ध झाले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईलच, तोपर्यंत जळगावच्या या 'गुप्त' राजकारणावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.