

जळगाव : शहरात स्मशानभूमीतून अस्थी आणि दागिने चोरी जाण्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. एकाच आठवड्यात ही दुसरी घटना उघडकीस आल्याने स्मशानभूमींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेची सुरुवात गेल्या आठवड्यात झाली होती. मेहरून स्मशानभूमीत छबाबाई पाटील यांच्या अंत्यसंस्कारांनंतर त्यांच्या अंगावरील दोन तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले होते. या घटनेला आठवडा उलटत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने दुसरी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव शहरातील खडके चाळीत राहणाऱ्या जिजाबाई पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्यावर छत्रपती शिवाजीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांचे नातेवाईक सोमवारी (दि.१३) सकाळी अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत आले असता, अंत्यसंस्कार केलेल्या जागेवरून डोक्याच्या आणि पायाच्या भागातील राख आणि अस्थी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. जिजाबाई पाटील यांच्या अंगावरील सुमारे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने देखील चोरट्यांनी लंपास केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या चोरीच्या पद्धतीत एक विचित्र गोष्ट आढळली. चोरट्यांनी दागिने चोरले असले तरी, जिजाबाईंच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पंचपक्वान्नाचे भोजनाचे पान ठेवलेले आढळले आहे. मृत व्यक्तीच्या भीतीने किंवा अन्य कोणत्या अंधश्रद्धेपोटी चोरट्यांनी हे भोजनाचे पान ठेवले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे.
दागिन्यांसाठी अस्थी चोरीसारखे घृणास्पद प्रकार सलग घडत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. मनपा प्रशासन स्मशानभूमीच्या सुरक्षिततेसाठी कोणतीच ठोस पाऊले उचलत नसल्याचे दिसत आहे. तसेच पोलिसांकडूनही या चोरट्यांवर अंकुश बसत नसल्याबद्दल नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. यामुळे जळगावातील स्मशानभूमींची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. यामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर नागरिकांचा संताप वाढताना दिसत आहे.
याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की, स्मशानभूमीत कॅमेरे लावावेत, अशी सूचना याआधीही करण्यात आली होती, मात्र याकडे कानाडोळा करण्यात आला. सोनं गेल्याचे दुःख नाही मात्र, अस्थी चोरीला गेल्याने नातेवाईकांची भावना दुखावली आहे. लवकरच जळगाव शहरातील चारही स्मशानभूमींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचेही आमदार भोळे यांनी स्पष्ट केले.