Jalgaon News | २०२६ मध्ये काढला आदेश, चौकशी २०२५ मध्ये; जळगाव तहसीलच्या 'अजब' पत्राने जिल्हाधिकारी चक्रावले

जळगाव तहसील कार्यालयाचा कारभार किती 'अप-टू-डेट' आहे, याचा एक धक्कादायक आणि तितकाच हास्यास्पद नमुना समोर
Jalgaon District Collector's Office / जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय
Jalgaon District Collector's Office / जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय Pudhari News Network
Published on
Updated on

Tehsil Office Strange Letter Jalgaon

​जळगाव : जळगाव तहसील कार्यालयाचा कारभार किती 'अप-टू-डेट' आहे, याचा एक धक्कादायक आणि तितकाच हास्यास्पद नमुना समोर आला आहे. एका चौकशी प्रकरणात चक्क वर्षभर मागे जाऊन उपस्थित राहण्याचे आदेश देऊन तहसीलदारांनी प्रशासकीय गोंधळाचा कळस गाठला आहे. या अजब आदेशामुळे चक्रावलेल्या संबंधित व्यक्तीने आता चक्क जिल्हाधिकाऱ्यांकडे 'टाईम मशीन'ची मागणी केली असून, या प्रकरणाची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

नेमका काय आहे घोळ?

जळगावच्या तहसीलदार डॉ. शितल राजपूत यांनी एका चौकशी प्रकरणात आदेश पारित केले आहेत. विशेष म्हणजे, हे आदेश १० मार्च २०२६ रोजी स्वाक्षरी करून काढण्यात आले आहेत. मात्र, या पत्रात संबंधित व्यक्तीला १२ मार्च २०२५ रोजी (म्हणजेच एक वर्ष आधी) चौकशीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे 'ई-मेल'वरचे पत्र संबंधित व्यक्तीला १३ मार्च २०२६ रोजी मिळाले. पत्र हातात पडताच २०२६ मध्ये बसून २०२५ च्या तारखेला हजर कसे व्हायचे? असा यक्षप्रश्न त्या व्यक्तीसमोर उभा राहिला.

Jalgaon District Collector's Office / जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय
Jalgaon Police News | ‘दक्षता’चीच वाट लावणारे बाप लेक गजाआड: व्यवस्थापकानेच लावला पोलिस दलाला चुना!

जिल्हाधिकाऱ्यांकडे 'टाईम मशीन'ची मागणी!

तहसीलदारांच्या या अजब कारभाराला त्याच शैलीत उत्तर देण्यासाठी संबंधित व्यक्तीने थेट जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे धाव घेतली आहे. "तहसीलदार डॉ. शितल राजपूत यांच्या आदेशानुसार मला २०२५ मध्ये मागे जाऊन चौकशीला हजर राहायचे आहे, त्यासाठी प्रशासनाने मला तातडीने 'टाईम मशीन' उपलब्ध करून द्यावे," असे पत्र या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. आता जिल्हाधिकारी खरंच टाईम मशीन शोधणार की या 'भविष्यात' जगणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केवळ सह्यांचाच 'धडाका'

सरकारी कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकारी पत्रावर काय मजकूर आहे, तारीख आणि वर्ष काय टाकले आहे, याची साधी शहानिशा न करता केवळ सह्यांचे 'पेव' फुटल्यासारखे काम करतात, हेच यावरून सिद्ध झाले आहे. २०२६ मध्ये बसून २०२५ चे आदेश काढणाऱ्या या 'स्मार्ट' कारभारामुळे जळगाव तहसीलची नाचक्की झाली आहे. अशा प्रकारच्या बेजबाबदारपणामुळे सर्वसामान्यांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागत असून प्रशासनाची प्रतिमा मलीन होत आहे.

Jalgaon District Collector's Office / जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय
Jalgaon News | जिल्हाधिकारी कार्यालयातच वृक्षांचा 'गळा आवळला': ३० वर्षांची झाडे धोक्यात; ठेकेदाराची मनमानी अन् अभियंत्यांचा आदेश धाब्यावर?

जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग?

एखाद्या व्यक्तीला भूतकाळात पाठवून त्याची चौकशी करण्याचा हा प्रयोग जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. या 'टाईम मशीन' तक्रारीनंतर जिल्हाधिकारी आता कोणती भूमिका घेतात आणि या 'भोंगळ' कारभाराला कशा प्रकारे चाप लावतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news