

Jalgaon Samtanagar Youth Death
जळगाव : शहरातील समता नगर येथील एका तरुणाने पत्नी नांदायला येत नाही म्हणून पोलीस स्टेशनसमोरच अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या आत्मदहनाच्या प्रयत्नात गंभीर भाजलेला तरुण सुनील ममराज पवार (वय २५) याचा 9 दिवसांच्या उपचारानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी (दि. १४) सायंकाळी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात आणि कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
सुनील पवार हा पत्नी परत येत नसल्यामुळे अत्यंत हताश झाला होता. त्याने आपली मामी सोबत घेऊन रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी गेला होता. त्याचवेळी त्याला पत्नीचा फोन आला. फोनवर त्यांच्यात मोठा वाद झाला. पत्नीने घरी येण्यास नकार दिल्याने सुनीलने संतापाच्या भरात आपल्या गाडीच्या डिकीतून पेट्रोलची बाटली काढली आणि स्वतःच्या अंगावर ओतून घेतली. क्षणार्धात त्याने स्वतःला पेटवून घेतले. ही धक्कादायक घटना पोलीस स्टेशनसमोरच घडल्याने एकच खळबळ उडाली.
पोलीस कर्मचारी योगेश माळी यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अंगावरील शर्ट काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुनीलला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेत तो ६० ते ६५ टक्के भाजला होता. त्याच्यावर गेल्या नऊ दिवसांपासून उपचार सुरू होते. भाजलेल्या जखमा अधिक गंभीर झाल्याने त्याला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. अखेर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. सुनीलच्या मृत्यूची बातमी कळताच समता नगर परिसरात आणि त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर रामानंद नगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.