

youth death after surgery Sakegaon Jalgaon
जळगाव : साकेगाव येथील गोदावरी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे एपीआय नारखेडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
स्वप्नील रोहिदास बनसोडे असे मृत तरुणाचे नाव असुन कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात कमरेत वेदना होत असल्याने स्वप्नील बनसोडे यांनी गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यावेळी डॉक्टरांनी मणक्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ९ फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. मात्र घरी आल्यानंतर शस्त्रक्रियेच्या जागी सूज येऊन पू साचल्याने प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, आवश्यक प्राथमिक तपासण्या जसे एक्स-रे, एमआरआय आदी न करता शस्त्रक्रिया करण्यात आली. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी स्वप्नील यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी किडनी व लिव्हरवर सूज आल्याचे सांगितले.
कुटुंबीयांनी दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी कागदपत्रांची मागणी केली असता ती देण्यास नकार देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, स्वप्नील यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले, मात्र नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
स्वप्नील बनसोडे यांचा मृत्यू हा संबंधित रुग्णालय व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच व्हिसेरा नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवावा व शवविच्छेदन इन-कॅमेरा करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, संबंधित रुग्णालय व जीएमसीकडून कागदपत्रे ताब्यात घेऊन तपास केला जाणार आहे. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात येणार असून, वैद्यकीय समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी दिली.
आम्ही रूग्णाच्या नातेवाईकांना झेरॉक्स करणे किंवा फोटोकॉपी करण्यासाठी मनाई केली नव्हती मात्र वैद्यकीय नियमानुसार फाईल देता येत नाही.
जनसंपर्क अधिकारी राहुल कुलकर्णी