जळगाव रावेर लोकसभेत युती की महाआघाडी !

जळगाव रावेर लोकसभेत युती की महाआघाडी !

जळगाव : नरेंद्र पाटील
लोकसभेचा बिगुल वाजलेला असून प्रत्येक पक्षाचे निरीक्षक हे लोकसभेच्या वेळापत्रकानुसार आपआपले दौरे करून पदाधिकाऱ्यांसाेबत चर्चा करून संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यासाठी लागलेले आहेत. यामध्ये भाजपने आघाडी घेतलेली असून त्यांनी पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रासाठी कोण मैदानात उतरणार त्या उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही.

भाजपाच्या यादीत इच्छुकांचे नाव येण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु असून त्यामानाने महाविकास आघाडीतील पक्षातील नेते व उमेदवार शांत बसून आहेत. तर अजून जागा वाटपावरील चर्चा सुरू आहे. जळगाव पेक्षाही रावेर लोकसभेत मोठ्या प्रमाणात रस्सीखेच दिसून येत आहे. भाजपाला येथील लोकसभा मतदारसंघात कोणते उमेदवार द्यायचे की विद्यमानांना पुन्हा संधी द्यायचे हा प्रश्न पडलेला आहे. तर शिंदे गटाने जळगाव लोकसभा मतदारसंघाची मागणी केलेली आहे. काँग्रेसने उमेदवार कोण असेल हा प्रश्न पडलेला दिसून येत आहे. तसेच  राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रावेर लोकसभेमध्ये इच्छुक आहेत. अजित पवार गट दोन्हीपैकी एकही लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक दिसून येत नाही.

राज्यात लोकसभेच्या 48 जागा असल्या तरी जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघाच्या जागांवर जेवढी रणधुमाळी सुरू आहे तेवढी कोणत्याही लोकसभेच्या जागेवरून दिसून येत नाही आहे. या ठिकाणी पक्षाच्या निरीक्षकापेक्षाही अति उत्साही व इच्छुक असलेले नेतेच मोठ्या प्रमाणात आपले दावेदार कशाप्रकारे आहेत हे सिद्ध करण्यात लागलेले आहेत.

जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक पंचवार्षिक निवडणुकांपासून युतीचा सरकार असो का काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असो, जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा या भाजपाच्या पक्षाकडे राहिलेल्या आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपा या दोन्ही जागांवर महायुतीमध्ये दावेदारी सांगत आहेत. तर दुसरीकडे महाआघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आपआपली दावेदारी सांगितली असली तरी काँग्रेसकडे भक्कम असा उमेदवार आता राहिलेला नाही.

रावेर लोकसभेमध्ये काँग्रेसचे हक्काचे असलेले उमेदवार यांनी पंजाची साथ सोडून हातामध्ये कमळ घेतले आहे. तर भुसावळ तसेच रावेर लोकसभेमधील अनेक जणांनी भाजपात प्रवेश घेतल्यामुळे रावेर लोकसभेमध्ये भाजपामय वातावरण पहावयास मिळत आहे. रावेर लोकसभेमध्ये शरद पवार गटाने आपली दावेदारी जरी जाहीर केलेली असली तरी ही जागा कोणाला सुटणार यावर सर्व काही आकडेवारी अवलंबून आहे. रावेर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या युती पक्षांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद याबाबत भाजपाला तोडीस तोड असलेला पक्ष आहे. त्याच जोडीला काँग्रेस रावेर विधानसभाची ताकद जोडून एक चांगले आव्हान उभे राहू शकते.

रावेर लोकसभेमध्ये प्रमुख दावेदार नसल्यामुळे जामनेरकर रहिवाशी रावेर लोकसभेमध्ये उभे राहिल्यानंतर त्यांना कोणीही हरवू शकत नाही असे वातावरण निर्माण झालेले आहे. रावेर लोकसभेचे विद्यमान खासदार, भाजप जिल्हाध्यक्ष, महिला उपाध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी इच्छुक असलेले दिसून येत आहे.

जळगाव लोकसभेमध्ये विद्यमान खासदार यांच्या दावेदारीवर प्रश्नचिन्ह असल्याची चर्चा असल्याने आता मुंबईचे व्यावसायिक यांनीही इच्छुक असल्याचे दावेदारी ठोकली असल्याचे चित्र आहे. असे व्यावसायिक जळगावी मुक्कामाला आलेले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघ आम्हाला देण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात असल्याचा त्यांनी दावाही केलेला आहे. या लोकसभेमध्ये तीन शिवसेनेचे आमदारही विद्यमान आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही या जळगाव लोकसभा मतदारसंघात दावेदारी सांगितली आहे. येथील इच्छुकांची नावे जरी जाहीर झालेली नसली तरी दोन जिल्हाप्रमुख अशी अनेक नावे समोर येत आहेत.

रावेर किंवा जळगाव लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे एकमेव आमदार असल्याने कार्यकर्ते जरी दिसत असले त्यांनी दोन्हीपैकी एकाही लोकसभेच्या जागेवर अद्यापही आपली दावेदारी सांगितलेली नाही. येत्या काळात होणाऱ्या जळगाव व रावेर लोकसभा निवडणुकीमध्ये रावेर लोकसभा ही महाराष्ट्राच्या दृष्टीने हॉट सीट राहण्याची चिन्हे दिसत आहेत. या दोन्ही जागा भाजपाला मिळणार का?  राष्ट्रवादी शरद पवार गटाला कोणती जागा मिळणार याबाबत पुढील चित्र स्पष्ट होईल.

लोकसभेच्या आखाड्यामध्ये सर्व पक्षाचे नेते निरीक्षक कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत. जर रावेर लोकसभेमध्ये मुक्ताईनगर व जामनेर यांच्यात सामना रंगला तर संपूर्ण महाराष्ट्राचे त्याकडे लक्ष लागले असेल. जामनेरकर आपण दावेदार नसले तरी पक्ष सांगेल आपण उमेदवारी करू असे उत्तर ते देत आहेत. त्यांच्यावर त्यांच्या सांगण्याप्रमाणे आठ लोकसभेची जबाबदारी आहे. एक जबाबदार व्यक्तीला एका लोकसभा मतदारसंघातून विजयी होणे सहज शक्य होऊ शकते अशी ही चर्चा रंगली आहे. हा सामना झाल्यास कोणाची किती ताकद आहे व कोणाचे किती दावेदार आहेत, कोण काय करू शकतो हेही लवकरच समोर येईल. रावेर लोकसभा मतदारसंघावर लेवा पाटील उमेदवारांनी आजपर्यंत राज्य केलेले आहे. आरक्षणाच्या मुद्दयावरुन चर्चेत असलेल्या जिल्ह्यातील मराठा समाजाचा उमेदवार कोणाच्या बाजूने झुकते माप देणार हेही लवकरच कळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news