Jalgaon News | भुसावळच्या किन्ही एमआयडीसीत ‘नमो एनर्जी’वर छापा; ३० हजार लिटर संशयास्पद ‘इंधन’ जप्त !

३६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त, ऑईल माफियांचे धाबे दणाणले, तालुका पोलिस आणि पुरवठा विभागाची कारवाई
Jalgaon News
Jalgaon News | भुसावळच्या किन्ही एमआयडीसीत ‘नमो एनर्जी’वर छापा; ३० हजार लिटर संशयास्पद ‘इंधन’ जप्त !
Published on
Updated on

जळगाव : भुसावळ तालुक्यातील किन्ही शिरपूर एमआयडीसी परिसरातील ‘नमो एनर्जी ऑईल’ कंपनीच्या गोदामात सुरू असलेल्या संशयास्पद इंधन साठवणुकीचा पर्दाफाश करण्यात भुसावळ तालुका पोलिस आणि पुरवठा विभागाला यश आले आहे. रविवारी (दि. १८) दुपारी प्रशासनाने टाकलेल्या धाड सत्रात तब्बल ३० हजार लिटर डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाने भरलेला टँकर जप्त करण्यात आला असून, एकूण ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुजरात कनेक्शन असलेल्या या कंपनीवर झालेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळखोर आणि ऑईल माफियांचे धाबे दणाणले आहेत.

नेमके प्रकरण काय?

भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेला किन्ही एमआयडीसीमधील प्लॉट नंबर F-50/51 वरील ‘नमो एनर्जी ऑईल’ या कंपनीत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. तेथे एक टँकर उभा असून त्यात डिझेलसारखा ज्वलनशील पदार्थ असल्याची खबर मिळताच यंत्रणा कामाला लागली. तहसीलदार यांच्या आदेशान्वये पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर, पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे आणि त्यांच्या पथकाने पंचासमक्ष रविवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास कंपनीच्या आवारात धडक दिली.

३० हजार लिटरचा साठा; ‘सुरत’ कनेक्शन उघड

घटनास्थळी जी.जे. २४ - व्ही. ७६५५ (GJ 24 V 7655) क्रमांकाचा टँकर उभा असल्याचे आढळून आले. पथकाने टँकरच्या कॉकमधून द्रव पदार्थ काढून पाहणी केली असता, त्याला डिझेलसारखा उग्र वास येत असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी उपस्थित कंपनी मालकाचे भाऊ अमीन इक्बाल तेली (रा. सुरत) यांची चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तरे मिळाली. हा टँकर ट्रान्सपोर्टचा असून तो भाडे करारावर आणल्याचे सांगण्यात आले, मात्र चालक जागेवर नव्हता.

असा झाला पंचनामा

अधिकाऱ्यांनी जागेवरच टँकरमधील इंधनाची घनता (Density 712) आणि तापमान (Temperature 20) मोजले. हा पदार्थ बायोडिझेल आहे की भेसळयुक्त डिझेल, याची खात्री करण्यासाठी नमुने सीलबंद करून प्रयोगशाळेत (CA) पाठवण्यात आले आहेत. या कारवाईत १५ लाख रुपये किमतीचा टँकर आणि २१ लाख रुपये किमतीचे ३० हजार लिटर इंधन (७० रुपये प्रति लिटर दराने) असा एकूण ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा टँकर आता भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात सुरक्षिततेसाठी हलवण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर, पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे, शिर्डी उपनिरीक्षक रवी नरवडे हवालदार उमाकांत पाटील गोपाळ गव्हाणे रतन परदेशी विकास सातदिवे राहुल वानखेडे आणि तालुका पोलीस स्टेशनचे पथकाने केली. पंच म्हणून तलाठी मनीषा बरडिया आणि प्रमोद ठोसर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news