

Rahul Gaikwad appointed as police inspector in-charge of Jalgaon crime branch
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एलसीबीचे निरीक्षक संदीप पाटील यांना पदावरून हटविण्यात आले असून त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संदीप पाटील यांच्यावर एका महिलेने शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी हे प्रकरण उपस्थित केले होते. संबंधित महिला एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेली होती, मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्याची माहिती मिळाली. तरीही जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने निर्णय घेत पाटील यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी गायकवाड यांची नियुक्ती केली.
एलसीबीतील पदभार स्वीकारून शंभर दिवसही पूर्ण करण्याआधीच, फक्त 87 दिवसांतच संदीप पाटील यांना पद सोडावे लागले. यापूर्वीही एलसीबीवर ड्रग्ज प्रकरण, पेट्रोल-गुटखा आणि हप्ता प्रकरणांमुळे वादंग निर्माण झाले होते. आता निरीक्षकावरील अत्याचाराच्या आरोपांमुळे स्थानिक गुन्हे शाखा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.