Jalgaon News | खड्ड्याचा ‘विघ्नहर्त्यालाच’ फटका! शिवाजीनगर पुलाखाली ट्रॅक्टर आदळला; गणेशमूर्तीचे किरकोळ नुकसान, भक्तांमध्ये संताप

नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या खड्ड्यांचा फटका आता गणेशमूर्तीच्या आगमन सोहळ्यालाही बसला
Jalgaon Pothole Issues
Jalgaon Pothole IssuesPudhari
Published on
Updated on

Jalgaon Pothole Issues

जळगाव : शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे आधीच त्रस्त झालेल्या जळगावकरांच्या संतापाचा पारा गणेशोत्सवाच्या तोंडावर चांगलाच चढला आहे. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या खड्ड्यांचा फटका आता गणेशमूर्तीच्या आगमन सोहळ्यालाही बसला. शिवाजीनगर उड्डाणपुलाखालील रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचे चाक आदळून अडकल्याने ट्रॉलीची चाके निखळली. या धक्क्यात गणेशमूर्तीच्या खालच्या भागाचे किरकोळ नुकसान झाले. या प्रकारामुळे गणेशभक्तांमध्ये तीव्र नाराजी आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात गणेशमूर्तींच्या आगमन सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. शिवाजीनगर परिसरातून गणेशमूर्ती ट्रॅक्टर-ट्रॉलीतून प्रतिष्ठापनेसाठी नेण्यात येत असताना उड्डाणपुलाखालील खोल खड्ड्यात ट्रॅक्टरचे चाक गेले. अचानक जोराचा धक्का बसल्याने ट्रॉलीची चाके निखळली आणि ती खड्ड्यात अडकली. यामुळे गणेशमूर्तीच्या खालच्या भागाला नुकसान झाले.

Jalgaon Pothole Issues
Jalgaon Bypass News | बायपासच्या निकृष्ट कामाचा फटका; सहा जळगावकरांचा मृत्यू, वारसांना सहा लाखांची भरपाई देण्याची मागणी

घटनेनंतर तातडीने क्रेन बोलावण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने ट्रॅक्टर-ट्रॉली आणि गणेशमूर्तीला आधार देऊन सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. डोळ्यांदेखत घडलेला हा प्रकार पाहून उपस्थित गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त झाली. त्याचवेळी महापालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली.

उत्सवाच्या तोंडावरही खड्डे कायम

गणेशोत्सवापूर्वी शहरातील प्रमुख मिरवणूक मार्ग तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे दावे महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी केले जातात. मात्र, शिवाजीनगर उड्डाणपुलाखालील रस्त्याची अवस्था अद्यापही ‘जैसे थे’ असल्याने गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शिवाजीनगरपासून मुख्य बाजारपेठेला जोडणाऱ्या या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोकाही वाढला आहे.

Jalgaon Pothole Issues
Jalgaon News : नशिराबादच्या 'भाई'ला अखेर 'एमपीडीए'चा दणका; थेट येरवडा कारागृहात रवानगी

खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गांवरील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी गणेशभक्त आणि नागरिकांनी केली आहे. शिवाजीनगर उड्डाणपुलाखालील रस्त्याचे तातडीने डांबरीकरण न केल्यास गणेश मंडळे आणि नागरिकांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news