

जळगाव (भुसावळ): जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अद्याप प्रभाग रचना जाहीर झालेली नसतानाही कार्यकर्त्यांनी संभाव्य नगराध्यक्षांची नावे जाहीर करत सोशल मीडियावर स्टेटस लावण्यास सुरुवात केली आहे.
भुसावळमध्ये याचे जिवंत उदाहरण पाहायला मिळत आहे, जिथे भाजपाचे आमदार व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांना ‘भावी नगराध्यक्षा’ म्हणून संबोधून कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. प्रभाग रचना आणि निवडणूक कार्यक्रमाबाबतची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, राजकीय पक्षांनीही आपापल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, महायुती व महाविकास आघाडी यांच्यात जोरदार टक्कर अपेक्षित आहे.
जळगाव महापालिकेत भाजपचे वर्चस्व असून, भाजपच महापालिका पुन्हा जिंकणार असल्याचा दावा भाजपने आधीच केला आहे. अशातच भुसावळ येथे भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीआधीच नगराध्यक्ष पदासाठी रजनी सावकारे यांचे नाव जाहीर केले आहे. सोशल मीडियावर रजनी सावकारे यांच्या फोटोसह ‘भावी नगराध्यक्षा’ अशा आशयाचे स्टेटस व्हायरल होत आहेत.
भुसावळ नगरपालिकेत भाजपचे पूर्वी वर्चस्व असताना खडसे गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशामुळे पक्षात फूट पडली होती. मात्र, आता अनेक कार्यकर्ते पुन्हा भाजपमध्ये परतल्याने पक्ष मजबूत झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर सावकारे गटाने आपली ताकद पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली आहे.
आरक्षण कोणास लागेल हे अद्याप ठरलेले नसले तरी, नगराध्यक्षपदासाठी रजनी सावकारे यांचे नाव भाजप वर्तुळात आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पती आमदार आणि मंत्री तर पत्नी नगराध्यक्षा, असे राजकीय समीकरण भुसावळमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.