

मुक्ताईनगर ( जळगाव ) : मुक्ताईनगरचे राजकारण हे राज्यभर शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील वादामुळे चर्चेत असते. मात्र आता एक महत्त्वाचा राजकीय कलाटणी घडताना दिसत आहे. शरद पवार गटाचे कट्टर समर्थक आणि मातब्बर नेते विनोद तराळ हे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मुक्ताईनगरात मोठा धक्का बसणार आहे.
अंतुर्ली हे शरद पवार गटाचे प्रमुख बालेकिल्ले मानले जाते. या भागातील प्रभावशाली नेते माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच ‘माफदा’ ( FDA - Maharashtra Food and Drug Administration ) संस्थेचे प्रदेशाध्यक्ष विनोद तराळ हे सध्या शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. पक्ष संकटात असतानाही त्यांनी एकनिष्ठ राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र नुकताच ते शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसह कोथळी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले होते, त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे.
पुढील आठवड्यात ते मुंबई येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि विकास अधिकारीदेखील शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अंतुर्ली परिसरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बळ मोठ्या प्रमाणावर ढासळणार असल्याचे बोलले जात आहे.
या घडामोडीमुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय बळात लक्षणीय वाढ होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाचा दबदबा अधिक वाढेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.