

जळगाव : नाशिक येथे होणाऱ्या 2027 च्या कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू असून, बैठका आणि कामे वेगात सुरू असल्याची माहिती दिली जात आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री कोण असणार, या पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला भाजप नेते व कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी थेट उत्तर न देता बगल दिली.
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदावर सतत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यात भाजपाचा एकही आमदार किंवा खासदार नसतानाही हे पद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, शिंदे गटाचे दादा भुसे यांनीही यावर दावा कायम ठेवला होता. यामुळे त्यावेळी पालकमंत्रीपदास स्थगिती देण्यात आली.
यानंतर, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले, त्यामुळे तेही पालकमंत्रीपदाचे इच्छुक असल्याची चर्चा सुरु झाली. दरम्यान, सध्या नाशिकचे पालकमंत्रीपद हे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. तर विशेषतः कुंभमेळ्यासंदर्भात "कुंभमेळा मंत्री" म्हणून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.
जळगाव येथे महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश झाल्याचा आनंद साजरा करताना, पत्रकारांनी गिरीश महाजन यांना नाशिकच्या पालकमंत्र्यांबाबत विचारले असता, त्यांनी कुंभमेळ्याच्या कामांची माहिती दिली, मात्र पालकमंत्री कोण असणार या मुख्य प्रश्नाला उत्तर देणे टाळले.
अशा स्थितीत नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी पालकमंत्री कोण राहणार, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांची भूमिका निश्चित आहे. त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारीही आहे. देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक येणाऱ्या कुंभमेळ्यात आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचे ठरणार आहे आणि त्यामुळे महाजन यांचा सहभाग निर्णायक असणार, हे निश्चित आहे.