

जळगाव : जळगाव महानगरपालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे १३ नगरसेवक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. हा प्रवेश सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्षांत रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्या प्रभागातून कोण उमेदवार योग्य ठरेल याचा आढावा घेण्यासाठी पक्षीय बैठका सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर काही नगरसेवक किंवा त्यांचे पती पक्षांतराच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे जळगाव महानगरपालिकेचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील निवडणुकीत काही नगरसेवकांनी शिवसेना उमेदवारांना पाठिंबा दिला होता. आता तेच नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. यामुळे आगामी निवडणुकांच्या गोळाबेरीजमध्ये मोठा बदल होऊ शकतो.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या फॉर्महाऊसवर नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक तसेच भाजप व शिंदे गटाशी संबंधित काही नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे या घडामोडींच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहेत.
या विषयावर नितीन लढ्ढा यांनी सांगितले की, "सुरेशदादा जैन यांच्याशी चर्चा झाली असून, भाजप प्रवेशाबाबत अंतिम निर्णय त्यांचाच असेल. त्यांच्या निर्णयानंतरच प्रवेशाची तारीख निश्चित होईल व प्रवेश सोहळाही पार पडेल."
दरम्यान, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते व ठाकरे गटाचे नगरसेवक सुनील महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, "अजून काहीही निश्चित नाही. मीडियानेच या चर्चांना अधिक रंग दिला आहे."