

Jalgaon Traffic Police News
जळगाव : शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि ‘बुलेट’च्या कर्कश आवाजाने नागरिकांना त्रस्त करणाऱ्या टवाळखोर वाहनचालकांविरुद्ध जळगाव पोलिसांनी कठोर कारवाई करत मोठी मोहीम राबवली. बाहेरून बसवलेले १०० कर्कश सायलेन्सर आणि २५० बेकायदेशीर फॅन्सी नंबर प्लेट्सवर थेट रोड रोलर फिरवून त्यांचा नायनाट करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत करण्यात आली. जप्त करण्यात आलेले सायलेन्सर आणि नंबर प्लेट्स आज रोड रोलरखाली चिरडून निकामी करण्यात आले.
अनेक दुचाकीस्वारांनी मूळ सायलेन्सर बदलून अत्यंत कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवले होते. त्यामुळे रुग्णालये, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट्स वापरणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. २०२५ मध्ये जिल्ह्यात ९३९ अपघातांमध्ये ४८७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ४५० अपघात प्राणांतिक ठरले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
पोलीस अधीक्षक धिवरे यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यात ‘शून्य प्राणहानी’चे उद्दिष्ट ठेवून रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून उपाययोजना राबवल्या जात आहेत. विना हेल्मेट वाहनचालक, ट्रिपल सीट प्रवास, रॅश ड्रायव्हिंग, मद्यपान करून वाहन चालवणे आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवणाऱ्यांवर विशेष पथकांकडून कारवाई केली जाणार आहे.
याशिवाय अल्पवयीन वाहनचालक, मोबाईलवर बोलत वाहन चालवणारे आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जळगावकरांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, अन्यथा अशाच कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.