Jalgaon Police Raid | शेतकऱ्यांना लुटणाऱ्या भंगार माफियांवर पोलिसांचा ‘वार’ : भंगार दुकानांवर छापे

भोकरी, कुऱ्हाडमध्ये भंगार दुकानांवर छापे; ७५ हजारांची कॉपर-अ‍ॅल्युमिनियम वायर जप्त, चौघांवर गुन्हे
Scrap Shop Raid Jalgaon
Scrap Shop Raid JalgaonPudhari
Published on: 
Updated on: 

Scrap Shop Raid Jalgaon

जळगाव : शेतकऱ्यांच्या शेतातील कॉपर वायर, विद्युत मोटारी, सोलर केबल तसेच महावितरणच्या केबल चोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी मंगळवारी (दि. २९) भोकरी आणि कुऱ्हाड येथील भंगार दुकानांवर धडक कारवाई करत तब्बल ७५ हजार ४०० रुपये किमतीच्या कॉपर व अ‍ॅल्युमिनियमच्या तारा जप्त केल्या. या मुद्देमालाबाबत समाधानकारक माहिती किंवा वैध कागदपत्रे सादर न केल्याने चौघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात शेतातील ट्रान्सफॉर्मर, विहिरीवरील विद्युत मोटारींच्या कॉपर तारा, सोलर केबल तसेच महावितरणच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. चोरीचा माल स्थानिक भंगार व्यावसायिकांकडून कोणतीही शहानिशा न करता खरेदी केला जात असल्याने चोरट्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर चोरीच्या मालाची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

Scrap Shop Raid Jalgaon
Jalgaon Encroachment | अजिंठा चौफुलीवरील भंगार बाजारावर महापालिकेचा हातोडा: दुकानदारांची तारांबळ

जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने २९ सप्टेंबर रोजी भोकरी, वरखेडी आणि लोहारा दूरक्षेत्रांतर्गत कुऱ्हाड गावातील संशयित भंगार दुकानांची तपासणी केली. यावेळी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर धातूच्या तारांचा साठा आढळून आला.

चौघांकडून तारांचा साठा जप्त

कलीम नबी काकर (रा. भोकरी) याच्या दुकानातून ३२ किलो कॉपर वायर, किंमत ३२ हजार रुपये, जप्त करण्यात आली.

हकीम आब्बाज काकर (रा. भोकरी) याच्याकडून १० किलो कॉपर वायर, किंमत १० हजार रुपये, हस्तगत करण्यात आली.

राजू उस्मान काकर (रा. भोकरी) याच्या दुकानातून १४ किलो अ‍ॅल्युमिनियम वायर, किंमत १ हजार ४०० रुपये, जप्त करण्यात आली.

अब्बुजर हकीम काकर (रा. कुऱ्हाड) याच्या दुकानातून ३२ किलो कॉपर वायर, किंमत ३२ हजार रुपये, हस्तगत करण्यात आली.

अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ७५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या तारांच्या खरेदीबाबत संबंधितांकडे कोणतेही वैध बिल किंवा कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे चौघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Scrap Shop Raid Jalgaon
Jalgaon Bribe Case | खाकीचा ‘दलाल’ जाळ्यात; हवालदाराच्यावतीने लाच उकळणारा एजंट जेरबंद!

चोरीच्या गुन्ह्यांची पाळेमुळे शोधण्यास सुरुवात

या तारा जिल्ह्यातील कोणत्या चोरीच्या गुन्ह्यांमधील आहेत, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाचा चोरीच्या घटनांशी संबंध आढळल्यास या प्रकरणाला आणखी मोठे वळण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भंगार दुकानांमधील खरेदी-विक्रीच्या नोंदींचीही पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या पथकाने केली. पथकात पोलिस हेडकॉन्स्टेबल अतुल पवार, अभिजित निकम, पोलिस नाईक दीपक अहिरे तसेच पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण देशमुख, भारत पाटील, शाम हटकर, मनोज बडगुजर आणि नामदेव इंगळे यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news