Jalgaon Bribe Case | खाकीचा ‘दलाल’ जाळ्यात; हवालदाराच्यावतीने लाच उकळणारा एजंट जेरबंद!

अटक न करण्यासाठी मागितली होती लाच; भुसावळ तालुका पोलिसांच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश, हवालदार महेश चौधरींच्या नावे सुरू होती वसुली
Bribe Case
Bribe CasePudhari
Published on: 
Updated on: 

जळगाव : गुन्ह्यात अटक न करण्यासाठी एका पोलीस हवालदाराच्या वतीने तब्बल २० हजार रुपयांची लाच उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका खाजगी दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बेड्या ठोकल्या आहेत. अमन जसबिंदर सनसोये (वय ३६, रा. दीपनगर, भुसावळ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या खाजगी इसमाचे नाव आहे. या कारवाईमुळे भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील भ्रष्ट साखळी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या इतर तीन साथीदारांना अटक न करण्यासाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश चौधरी यांनी प्रत्येकी २५ हजार रुपये प्रमाणे तब्बल एक लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ५० हजार रुपये यापूर्वीच उकळण्यात आले होते. उर्वरित ५० हजारांसाठी तक्रारदारामागे ससेमिरा लावल्याने, तक्रारदाराने अखेर जळगाव एसीबीकडे धाव घेत रीतसर तक्रार नोंदवली होती.

दि. ३ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. त्यावेळी खाजगी एजंट अमन सनसोये याने तक्रारदाराची भेट घेतली. हवालदार महेश चौधरी यांच्या वतीने तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्यास संमती दर्शवली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून खाजगी इसम अमन सनसोये याला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, अप्पर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक सुरेश पाटील, बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे व राकेश दुसाने यांच्या पथकाने केली. पोलीस हवालदाराच्या भूमिकेबाबतही आता सखोल चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news