

जळगाव : जळगाव-पाळधी रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून मारहाण करत रोख रक्कम लुटणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन प्रकाश पाटील (वय ३५, रा. खोटे नगर, जळगाव) हे त्यांच्या मित्रांसह मोटारसायकलने जळगाव-पाळधी रस्त्यावरून जात होते. दरम्यान, हॉटेल साई गार्डन व हॉटेल राधिका परिसरात सार्वजनिक रस्त्यावर चार आरोपींनी त्यांची मोटारसायकल अडवली. आरोपींनी चाकूचा धाक दाखवत फिर्यादी व त्यांच्या मित्रांना चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी करून त्यांच्या खिशातील ७ हजार ८०० रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली. यानंतर मोटारसायकलची तोडफोड करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी तातडीने डीबी पथकाला तपासासाठी रवाना केले. गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे पथकाने अवघ्या दोन तासांत आरोपींचा शोध घेत आरोपी चेतन उर्फ बटाटा रमेश सुशीर (वय २१, रा. संत मिराबाई नगर, जळगाव)उमाकांत दत्तात्रेय जाधव (रा. संत मिराबाई नगर, जळगाव) गौरव संजय जाधव (वय २१, रा. साईनगर, जळगाव) रोशन भगवान पाटील (वय २६, रा. पांडुरंग नगर, जळगाव) यांना अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार चेतन उर्फ बटाटा सुशीर हा हिस्ट्रीशीटर असून त्याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच उमाकांत जाधव हा तडीपार गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत डीबी पथकाचे सहाय्यक फौजदार सुनील पाटील, पोलीस हवालदार योगेश पाटील, अविनाश देवरे, कैलास इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण कोळी, दीपक देवरे, किरण पाटील तसेच वाहन चालक पंकज देशमुख यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे करीत आहेत.