

Jalgaon Construction worker dispute
जळगाव : शहरातील पिंप्राळा भागात भर दुपारी गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बांधकाम करणाऱ्या एका मिस्त्रीला जाब विचारताना हवेत गोळीबार झाला. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जळगाव महानगरपालिकेचे मतदान सुरू असतानाच ही घटना घडली. पिंप्राळा परिसरात राहणारा बांधकाम मिस्त्री मुस्तफा शेख सलीम याने तुषार सोनवणे यांच्या घराचे बांधकाम घेतले होते. मात्र सहा ते सात महिन्यांपूर्वी सदर काम अर्धवट सोडून तो पळून गेला होता. 14 तारखेला तो पुन्हा पिंप्राळा भागात परत आला.
15 तारखेला मुस्तफा शेख सलीम हा पिंप्राळा परिसरातील एका घरासमोर उभा असताना तुषार सोनवणे, आशिष सोनवणे आणि सचिन चव्हाण हे तिघे तेथे आले. त्यांनी बांधकामाचे काम पूर्ण करून देण्याचा किंवा घेतलेले पैसे परत देण्याचा तगादा लावला. यावेळी आरोपी सचिन चव्हाण याने हवेत गोळी झाडली. गोळीबारानंतर तुषार सोनवणे, आशिष सोनवणे आणि सचिन चव्हाण हे तिघेही घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट देत संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक गुंजाळ, राहुल गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा तसेच रामानंद पोलीस स्टेशनचे पथक रवाना करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.