

जळगाव: जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ 'अ' मधील निवडणूक प्रक्रियेला आज बोगस मतदानाच्या प्रयत्नाने गालबोट लागले. आर. आर. विद्यालय मतदान केंद्रावर सुमारे ४० ते ४५ संशयित मतदारांची 'फौज' घुसल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढतीत या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
आर. आर. विद्यालयात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, दुपारी काही मतदारांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील यांनी तातडीने आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे थेट तक्रार नोंदवत या मतदारांच्या ओळखपत्रांची पडताळणी करण्याची मागणी केली. प्रशासकीय कारवाईचा बडगा: तक्रार मिळताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत ४० ते ४५ संशयितांची कसून चौकशी केली. जेव्हा या मतदारांकडे अधिकृत ओळखपत्र आणि वास्तव्याचा पुरावा मागण्यात आला, तेव्हा ते सादर करण्यात ही मंडळी सपशेल अपयशी ठरली. परिणामी, अधिकाऱ्यांनी त्यांना मतदानापासून रोखत केंद्राबाहेरचा रस्ता दाखवला.
या प्रलंबित वादाने आता राजकीय वळण घेतले आहे. माजी उपमहापौर विष्णू भंगाळे आणि ॲड. पियुष पाटील यांच्यात येथे 'काटे की टक्कर' पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रभागात ३ हजारांहून अधिक बोगस आणि दुबार मतदार असल्याची तक्रार मी प्रशासनाकडे आधीच केली होती. तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच आज हा 'बोगस मतदानाचा प्रयोग' करण्याचा धाडसी प्रयत्न झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
या प्रकारानंतर आर. आर. विद्यालय केंद्राबाहेर समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असली तरी, या 'बोगस'गिरीच्या चर्चेने संपूर्ण जळगाव शहरात खळबळ माजली आहे.