

Married woman assaulted in Pachora
जळगाव : पाचोरा तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पोटच्या चिमुरडीचे 'बरे-वाईट' करण्याची धमकी देऊन एका २३ वर्षीय विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. संशयित आरोपीने पीडितेला धमकावून पाचोरा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्या असहायतेचा फायदा घेतला. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.
कुऱ्हाड तांडा (ता. पाचोरा) येथील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय रंजना (नाव बदलले आहे) या गृहिणीला त्याच गावातील नराधम बाळू काळू राठोड याने आपल्या जाळ्यात ओढले. पीडितेची लहान मुलगी 'खुशी' हिला हिसकावून घेत, "जर तू माझ्यासोबत आली नाहीस, तर तुझ्या मुलीचे काहीतरी बरे-वाईट करेन," अशी धमकी त्याने दिली. चिमुरडीच्या जिवाच्या भीतीने पीडितेने नराधमाचे म्हणणे मान्य केले.
आरोपी बाळू राठोड याने सुरुवातीला पीडितेला पाचोरा येथील एका हॉटेलवर नेले, तिथे तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. एवढ्यावरच न थांबता, "आता जर तू माझ्यासोबत आली नाहीस, तर मी तुझी सगळीकडे बदनामी करेन आणि तुझ्या मुलीला संपवून टाकीन," अशी धमकी देत त्याने तिला अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील हॉटेलवर नेले. तिथेही त्याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने अत्याचार केला.
सततच्या धमकीला आणि अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित महिलेने पाचोरा पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून मंगळवारी ( दि. ३) दुपारी १२.२७ वाजता संशयित आरोपी बाळू राठोड याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनेनंतर संशयित आरोपी बाळू राठोड फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.